

बीड, 31 डिसेंबर (हिं.स.)। गेली २५ वर्षे सातत्याने शिक्षण क्षेत्रात कार्य करणे सोपे नाही. 'गंगाई-बाबाजी कला रौप्यमहोत्सव' हे त्या परिश्रमांचे फलित आहे. शिक्षण हाच आयुष्याचा खरा आधार असून, स्वाभिमानानेच पुढे चला, असे आवाहन अभिनेत्री हेमांगी कवी यांनी केले.
आष्टी येथे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या आई-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गंगाई-बाबाजी महोत्सव गेल्या २५ वर्षांपासून आयोजित केला जातो. यंदा महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री हेमांगी कवी यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी माजी आ. भीमराव धोंडे, दमयंती धोंडे, संस्थेचे सहसचिव डॉ. अजय धोंडे, युवा नेते अभय धोंडे, चेअरमन राजेंद्र धोंडे, किशोर नाना हंबर्डे, पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे,
आदी मान्यवर उपस्थित होते.
हेमांगी कवी म्हणाल्या, महोत्सवात मुलींची उपस्थिती मुलांपेक्षा अधिक आहे.
समाजात सकारात्मक बदल घडतो आहे, हे यावरून दिसते. पुढे मुली आणि मुले यांच्यात कोणताही संकोच राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis