
जळगाव, 31 डिसेंबर (हिं.स.)जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर आज ३१ डिसेंबर रोजी प्राप्त अर्जाची छाननी करण्यात येतेय. मात्र याच दरम्यान भाजपने घेतलेल्या आक्षेपामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक उमेदवारांचे अर्ज धोक्यात आहे. ठाकरे गटाच्या 35 उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत जोडलेल्या एबी फॉर्मवर ‘स्कॅन केलेली सही’ असल्याचा दावा भाजपने केला आहे. हे सर्व अर्ज निवडणूक आयोगाच्या नियमानुसार बेकायदेशीर ठरवून रद्द करण्याची मागणी भाजपने केली आहे.
निवडणूक प्रक्रियेच्या नियमांनुसार, उमेदवारी अर्जावर संबंधित उमेदवाराची स्वतःच्या हस्ताक्षरातील मूळ स्वाक्षरी असणे बंधनकारक असते. मात्र, जळगावमधील काही प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांनी अर्जावर डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक सहीचा वापर केला आहे, असा दावा भाजपने केला आहे. या संदर्भात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून, हे नियमबाह्य अर्ज तत्काळ रद्द करण्यात यावेत, अशी मागणी लावून धरली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर