जळगाव - १ हजाराहून अधिक अर्ज दाखल
जळगाव, 31 डिसेंबर, (हिं.स.) - जळगाव महानगरपालिकेच्या ७५ जागांसाठी तब्बल १ हजाराहून अधिक अर्ज दाखल झाले असून अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेनंतर आता आज ३१ डिसेंबर रोजी सकाळपासून प्राप्त अर्जांच्या छाननी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. अर्जातील क
जळगाव - १ हजाराहून अधिक अर्ज दाखल


जळगाव, 31 डिसेंबर, (हिं.स.) - जळगाव महानगरपालिकेच्या ७५ जागांसाठी तब्बल १ हजाराहून अधिक अर्ज दाखल झाले असून अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेनंतर आता आज ३१ डिसेंबर रोजी सकाळपासून प्राप्त अर्जांच्या छाननी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. अर्जातील कागदपत्रांची तपासणी, पात्रता पडताळणी तसेच आवश्यक नोंदी करण्यासाठी स्वतंत्र कक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान छाननीच्या पार्श्वभूमीवर महापालिका परिसरात उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची तोबा गर्दी झाली आहे.

महापालिकेच्या एकूण ७५ जागांसाठी तब्बल १०३८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. ३० डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. यांनतर आज ३१ डिसेंबर रोजी महापालिका प्रशासनाकडून प्राप्त अर्जांच्या छाननी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. छाननीच्या प्रक्रियेसाठी महापालिका आवारात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे एकूण ६ स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले असून, प्रत्येक कक्षात अर्जांची अत्यंत बारकाईने तपासणी केली जात आहे.छाननी प्रक्रियेला सुरुवात होताच विविध प्रभागांतील उमेदवारांनी एकमेकांविरुद्ध हरकती घेण्यास सुरुवात केली आहे. अनेक उमेदवारांनी आपले अर्ज बाद होऊ नयेत किंवा प्रतिस्पर्ध्याचा अर्ज कसा तांत्रिकदृष्ट्या अवैध आहे, हे सिद्ध करण्यासाठी चक्क वकिलांची फौज सोबत आणली होती. शपथपत्रातील त्रुटी, गुन्ह्यांची माहिती दडवणे किंवा आरक्षणाचे दाखले यांसारख्या मुद्द्यांवरून आक्षेप नोंदवले जात आहेत. यामुळे पालिका प्रशासनात युक्तिवादाचा मोठा पेच पाहायला मिळत आहे.निवडणूक निर्णय अधिकारी प्रत्येक हरकत गांभीर्याने नोंदवून घेत असून, नियमानुसार त्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न कर्मचारी करत आहेत. छाननीच्या पार्श्वभूमीवर महापालिका परिसरात उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची तोबा गर्दी झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. आज संध्याकाळपर्यंत कोणाचे अर्ज मंजूर होतात आणि कोणाचे स्वप्न भंगते, याकडे संपूर्ण जळगाव शहराचे लक्ष लागले आहे. या प्रक्रियेनंतरच खऱ्या अर्थाने निवडणुकीचे रणांगण कोणासाठी मोकळे होणार, याचे चित्र स्पष्ट होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande