
रायगड, 31 डिसेंबर (हिं.स.)। अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील अलिबाग बायपास कॉर्नर ते कुरुळ या महत्त्वाच्या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात कुरुळ ग्रामपंचायतीने आक्रमक भूमिका घेत दंड थोपटले आहेत. खड्डेमय, उखडलेल्या डांबराचा व पावसात साचणाऱ्या पाण्याचा फटका प्रवासी व स्थानिक नागरिकांना बसत असून, अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत चालल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मंगळवारी (दि. २३) झालेल्या ग्रामसभेत या मार्गाच्या दुरुस्तीसाठी ठराव मंजूर करण्यात आला. “हे रस्ते नाहीत, तर मृत्यूचे सापळे आहेत,” अशी तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांनी नोंदवली. अलिबाग हे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असून अलिबाग–रोहा, अलिबाग–रेवदंडा, मुरूड व मुंबईकडे जाण्यासाठी कुरुळ हे मध्यवर्ती ठिकाण आहे. हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गाची गेल्या सहा महिन्यांपासून दुरवस्था असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
खोल खड्डे, धुळीचे साम्राज्य व खराब रस्त्यांमुळे विद्यार्थी, रुग्ण, महिला व ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. धुळीमुळे आरोग्याचे प्रश्न गंभीर झाले असून, दैनंदिन प्रवास करणाऱ्यांचा त्रास वाढला आहे. तातडीने दुरुस्ती न झाल्यास उपोषण व रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा निर्णय ग्रामसभेत एकमताने घेण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अॅड. प्रसाद पाटील यांनी प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम देत “आता शांत बसणार नाही; रस्ते दुरुस्त करा, अन्यथा जनआंदोलन अटळ,” असा इशारा दिला. जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, जिल्हा परिषद सीईओ व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीमार्फत ठरावाची माहिती देण्यात आली आहे. प्रशासन पुढे काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके