
बीड, 31 डिसेंबर (हिं.स.) - येथील संस्कार विद्यालयाच्या प्रांगणात वंदे मातरम् गीताच्या १५० वर्षपूर्तीचा स्मरण महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. हजारो विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे वंदे मातरम् हे देशभवती गीत उच्च स्वरात गायले. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून इतिहास अभ्यासिका वनिता रत्नपारखी उपस्थित होत्या. मुख्याध्यापक विनायक जोशी, पर्यवेक्षक रघुनाथ तावरे आणि संस्कृत अध्यापिका प्रज्ञा खके यांची विशेष उपस्थिती होती. विद्याथ्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरातून तयार केलेल्या वंदे मातरम् गीताच्या भित्तिपत्रकांचे व नकाशांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. श्रावणी गोरे हिने पेन्सिल स्केच केलेले बंकिमचंद्र चटर्जी यांचे चित्रही यावेळी प्रकाशित करण्यात आले. वनिता रत्नपारखी यांनी वंदे मातरम् गीताच्या निर्मितीमागील इतिहास सोप्या भाषेत उलगडला. बीबीई या आंतरराष्ट्रीय संस्थेने निवडलेल्या दहा देशभक्ती गीतांमध्ये वंदे मातरम् या गीताला दुसरा क्रमांक मिळाल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. संस्कृत अध्यापिका प्रज्ञा खके यांनी विद्यार्थ्यांकडून सामूहिक संगीतबद्ध स्वर गायन करून घेतले. श्रावणी गोरे हिने साकारलेली भारतमातेची रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. सामूहिक वंदे मातरम् गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis