
अमरावती, 8 डिसेंबर (हिं.स.) - चांदुर रेल्वे येथे २ डिसेंबरला मतदाना दरम्यान जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या बॉडिगार्डला धक्काबुक्की करुन शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी चांदुर रेल्वे पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते निलेश विश्वकर्मा यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे अंगरक्षक निकेतन नरेशराव राऊत (३९) यांनी या विषयी चांदुर रेल्वे पोलिस स्टेशनला तक्रार दिली. भाजपकडून मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करीत विश्वकर्मा यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी वादविवाद घातला होता. यावेळी बॉडीगार्ड राऊत यांच्याशी धक्काबुक्की ही केली होती. चांदुररेल्वेच्या सरस्वती विद्यालय येथे ही घटना घडली होती. याप्रकरणी चांदुररेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
माहितीनुसार, तक्रारदार निकेतन नरेश राऊत (३९) हे अमरावती ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या आदेशानुसार अमरावतीचे जिल्हा दंडाधिकारी यांचे अंगरक्षक म्हणून अधिकृत कर्तव्यावर होते. ही घटनाघडली तेव्हा सरस्वती विद्यालय येथील मतदान केंद्राजवळ कर्तव्यावर होते. आरोपी नीलेश विश्वकर्मा १०० मीटर प्रतिबंधित क्षेत्रात असलेल्या मतदान केंद्राच्या आवारात गेले. तिथे अंगरक्षकासोबत धक्काबुक्की झाली. तसेच संपूर्ण घटनेचे चित्रीकरण केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले. सरकारी कामावर असलेल्या अंगरक्षकाला शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याने सरकारी कामात अडथळा निर्माण झाला. या घटनेनंतर अंगरक्षक अंगरक्षक निकेतन राऊत यांनी शनिवारी चांदूर रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपीविरुद्धसरकारी कामात अडथळा आणणे, प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणे आणि गोंधळ निर्माण करणे या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी