
नागपूर, 8 डिसेंबर (हिं.स.) : महाराष्ट्र विधानसभा सभागृहाने माजी मंत्री, माजी आमदार यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव एकमताने मंजूर केला. शोक प्रस्ताव मंजूर करताना सदस्यांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली.
कै. शिवाजीराव कर्डिले, महादेवराव शिवणकर, भारत बोंद्रे, श्याम उर्फ जनार्दन अष्टेकर, यशवंत दळवी, नारायण पटेल, सिद्रामप्पा मलकप्पा पाटील, गिल्बर्ट मेंडोंसा, राजीव देशमुख आणि श्रीमती निर्मला ठोकळ या लोकप्रतिनिधी व समाजसेवकांनी शिक्षण, सहकार, शेती, क्रीडा, जलसंधारण, उद्योग, आरोग्य, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. या दिवंगत सदस्यांनी विधानसभा/लोकसभा, पालिका, जिल्हा परिषद, सहकारी संस्था, शिक्षणसंस्था यामधून दीर्घकाळ जनसेवा केली. त्यांच्या निधनामुळे राज्याची अपरिमित हानी झाल्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी यावेळी नमूद केले.
विधान परिषदेत दिवंगत सदस्या श्रीमती निर्मला शंकरराव ठोकळ आणि दिवंगत सदस्य प्रकाश केशवराव देवळे यांना विधान परिषदेत श्रद्धांजली वाहण्यात आली. दिवंगत सदस्यांच्या दुःखद निधनाबद्दल सभापती प्रा. राम शिंदे यांनी या संदर्भातील शोक प्रस्ताव मांडला आणि दिवंगत सदस्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी