अबुधाबी, 27 सप्टेंबर (हिं.स.)आशिया कप २०२५ चा उत्साह शिगेला पोहोचला जेव्हा शेवटचा सुपर ४ चा अखेरचा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या, भारत आणि श्रीलंका सामन्यात दोघांनीही त्यांच्या निर्धारित २० षटकात प्रत्येकी २०२ धावा केल्या. सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने २ धावा केल्या आणि भारतासमोर ३ धावांचे लक्ष्य ठेवले. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर तीन धावा केल्या आणि संघाला रोमांचक विजय मिळवून दिला.
सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने फक्त दोन धावा केल्या आणि भारतासमोर ३ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर तीन धावा केल्या आणि संघाचा शानदार विजय निश्चित केला. या विजयासह, भारताने आशिया कपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. आता भारतीय संघाता सामना रविवारी पाकिस्तानशी होईल. आशिया कपच्या ४१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत आमनेसामने येतील.
अभिषेक शर्माने अर्धशतकासह आपला प्रभावी फॉर्म कायम ठेवला, तर संजू सॅमसनने उपयुक्त ३९ धावा करत श्रीलंकेविरुद्ध आशिया कपच्या शेवटच्या सुपर ४ सामन्यात भारताला पाच बाद २०२ धावांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. या स्पर्धेत कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी भारताने ओमानविरुद्ध १८८ आणि अफगाणिस्तानने हाँगकाँगविरुद्ध १८८ धावा केल्या होत्या.
अभिषेकने ३१ चेंडूत ६१ धावा केल्या. तर पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या सॅमसनने २२ चेंडूत ३९ धावा केल्या. तिलक वर्माने ३४ चेंडूत नाबाद ४९ धावा केल्या. संपूर्ण स्पर्धेत अभिषेकने गोलंदाजांना आव्हान दिले आणि अर्धशतकांची हॅटट्रिक केली. या डावात त्याने ८ चौकार आणि २ षटकार ठोकले. तर शुभमन गिल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव स्वस्तात बाद झाले. पण अभिषेक तिसऱ्यांदा शतक झळकावण्यात अपयशी ठरला. कारण तो श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंका याच्याकडून डीप मिडविकेटवर झेलबाद झाला. गिलला महेश थीकशनाने ४ धावांवर बाद केले. कर्णधार सूर्यकुमारला १२ धावांवर वानिंदू हसरंगाने एलबीडब्ल्यू बाद केले.नवीन फलंदाजी क्रमात लय मिळवत, सॅमसन स्पर्धेत पहिल्यांदाच चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने हसरंगाच्या चेंडूसह ३ षटकार मारले. त्याने आणि तिलकने ६.५ षटकांत ६६ धावांची भागीदारी केली. अक्षर पटेलने षटकार मारून भारतीय डाव संपवला.
सलामीवीर पथुम निस्सांकाच्या आक्रमक शतकामुळे आशिया कपमध्ये पहिल्यांदाच भारतीय गोलंदाजांवर दबाव आला होता. पण सुपर ओव्हरमध्ये अर्शदीप सिंगच्या भेदक माऱ्यामुळे भारताला श्रीलंकेला पराभूत करत स्पर्धेत सलग सहावा विजय मिळवता आला. हर्षित राणाच्या शेवटच्या षटकात १२ आणि शेवटच्या षटकात तीन धावांची आवश्यकता असताना दासुन शनाकाला फक्त दोन धावा करता आल्या. ज्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
भारताने ठेवलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना कुसल मेंडिसला पहिल्याच षटकात हार्दिक पंड्याने बाद केले. निसांका (५८ चेंडूत १०७) आणि परेरा (३२ चेंडूत ५८) यांनी भारतीय गोलंदाजांना संधी दिली नाही. हर्षितने ४ षटकात ५४ धावा देत एक विकेट घेतली. तर अर्शदीपने ४ षटकात ४६ धावा दिल्या. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने ३ षटकात ३२ धावा दिल्या. श्रीलंकेच्या दोन्ही फलंदाजांनी १२ षटकांपेक्षा कमी वेळात १२८ धावा केल्या. ज्यामुळे सूर्यकुमार यादवची चिंता वाढली. वरुण चक्रवर्तीने शेवटी परेराला बाद करून भागीदारी मोडली. चरिथ असलंका (५) आणि कामिंदू मेंडिस (३) देखील लागोपाठ बाद झाले. निस्सांकाने अर्शदीपच्या षटकात ५२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने आपल्या डावात ७ चौकार आणि ६ षटकार मारले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे