कोण होणार आशिया चषकाचा मानकरी : भारत-पाकिस्तानमध्ये विजेतेपदासाठी लढत
अबुधाबी, 27 सप्टेंबर (हिं.स.) आशिया कप टी-२० चा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. आशिया कपच्या ४१ वर्षांच्या इतिहासात हे पहिलीच वेळ असेल. जेव्हा हे दोन्ही संघ अंतिम फेरीत एकमेकांसमोर येणार आहे. ही लढत अत्यंत रोमांचक होण्याची अप
सूर्यकुमार यादव आणि सलमान अली आगा


अबुधाबी, 27 सप्टेंबर (हिं.स.) आशिया कप टी-२० चा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. आशिया कपच्या ४१ वर्षांच्या इतिहासात हे पहिलीच वेळ असेल. जेव्हा हे दोन्ही संघ अंतिम फेरीत एकमेकांसमोर येणार आहे. ही लढत अत्यंत रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदलांची शक्यता आहे. तर पाकिस्तानच्या संघात बदलांची अपेक्षा नाही.

दुबईमध्ये खेळल्या जाणाऱ्या या हाय-व्होल्टेज सामन्यात मैदानावरील आणि बाहेरील चर्चेचा विषय बनत आहेत. सामना जवळ येताच वातावरण तणावपूर्ण आणि रोमांचक होत आहे. यावेळी भारत-पाकिस्तान सामना केवळ क्रिकेटपुरता मर्यादित नाही. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉसच्या वेळी हस्तांदोलन करण्यास नकार देणे, सामन्यानंतर हस्तांदोलन करण्यास नकार देणे आणि पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हरिस रौफने केलेले वादग्रस्त हावभाव या सर्वांनी लक्ष वेधले होते.

हरिस रौफच्या चिथावणीखोर हावभावामुळे हे प्रकरण आणखी चिघळले होते. आणि त्यामुळे आयसीसीने त्याच्या मॅच फीच्या ३० टक्के दंड ठोठावला होता. सूर्यकुमार यादवलाही त्याच्या मॅच फीच्या ३० टक्के दंड ठोठावण्यात आला आणि आयसीसीने राजकीय वक्तव्ये करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनीही त्यांच्या एक्सवर वारंवार चिथावणीखोर पोस्ट टाकून वादाला खतपाणी घातले होते. नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काम करतात.

भारत आतापर्यंत स्पर्धेत अपराजित राहिला आहे. सलग सहा विजयांपैकी केवळ श्रीलंकेवरुद्धचा सामना सुपर ओव्हरमध्ये जिकंला होता. पण अंतिम सामन्यापूर्वी दुखापतींमुळे भारतीय गोटात चिंतेचे वातवरण आहे. श्रीलंकेविरुद्धच्या फक्त एका षटकानंतर हॅमस्ट्रिंग स्ट्रेनमुळे हार्दिक पांड्याला मैदान सोडावे लागले होते. अभिषेक शर्मालाही क्रॅम्प्सचा त्रास जाणवला होता. गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्केल यांनी अभिषेक तंदुरुस्त असल्याचे घोषित केले आहे. पण हार्दिकच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. हार्दिक खेळू शकला नाही, तर तो टीम इंडियासाठी मोठा धक्का असेल. तो गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये भारतीय संघाचा प्रमुख आधारस्तंभ आहे. हार्दिक खेळला नाही तर संघ व्यवस्थापन अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवणार का हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. हार्दिकऐवजी संघात अर्शदीप सिंगला संधी मिळण्याची चर्चा आहे.

अभिषेक शर्मा या स्पर्धेत भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे. त्याने 6 सामन्यांमध्ये ३०९ धावा केल्या आहेत. तर तिलक वर्मा १४४ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. संपूर्ण स्पर्धेत भारताची फलंदाजी अभिषेकवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. जर तो अंतिम फेरीत लवकर बाद झाला तर इतर फलंदाज संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन देणार का याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष असणार आहे. सूर्यकुमार यादव आतापर्यंत मोठ्या खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. शुभमन गिल अनेक वेळा चांगल्या सुरुवातीनंतर त्याचे रुपांतर मोठ्या खेळीत करु शकलेला नाही. तर संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी काही सामन्यांमध्येच चांगली कामगिरी केली आहे.

संपूर्ण स्पर्धेत पाकिस्तानचा फलंदाजी क्रम अस्थिर राहिला आहे. साहिबजादा फरहान काही प्रमाणात जसप्रीत बुमराहला त्रास देऊ शकला आहे. पण इतर फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. सॅम अयुब या स्पर्धेत सपशेल अपयशी ठरला आहे. हुसेन तलत आणि सलमान अली आघा यांना भारतीय फिरकी गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करावा लागला आहे. गोलंदाजीमध्ये शाहीन शाह आफ्रिदी आणि हरिस रौफवर पाकिस्तानच्या संघ अवलंबून असणार आहे. पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांना रोखण्याचं आव्हान असेल. दोन्ही संघ जिंकण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरणार असल्याने क्रिकेट चाहत्यांना एक रोमहर्षक लढत पाहण्याची नामी संधी मिळणार आहे.

---------------

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande