सेऊल, २७ सप्टेंबर (हिं.स.) - भारतीय पॅरा-तिरंदाज शीतल देवीने महिला कंपाउंड ओपन फायनलमध्ये तुर्कीच्या ओजनूर कुरे गिर्डीला पराभूत करत जागतिक तिरंदाजी पॅरा-आर्काइव्ह चॅम्पियनशिपमध्ये आपले पहिले सुवर्णपदक पटकावले. सुवर्णपदकाच्या सामन्यात शीतलने दुसऱ्या फेरीपासून आघाडी घेतली होती. आणि संपूर्ण संयम राखला. अंतिम १४६-१४३ असा विजय तिने मिळवला. या विजयासह शीतलने तीन वेळा विश्वविजेत्या आणि २०२४ पॅरिस पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्याला पराभवाचा धक्का देण्याची किमया साधली.
शीतलचे हे दिवसातील तिसरे पदक होते. तिने सांघिक स्पर्धांमध्ये रौप्य आणि कांस्यपदकही जिंकले आहे. शीतल देवीने महिला कंपाउंड ओपन टीम इव्हेंटमध्ये सरितासोबत रौप्यपदक जिंकले होते. अंतिम फेरीत तुर्कीने त्यांना पराभूत केले होते. त्यानंतर तिने मिश्र टीम कंपाउंड ओपन इव्हेंटमध्ये टॉमन कुमारसोबत कांस्यपदक पटकावले. ग्रेट ब्रिटनच्या नाथन मॅक्वीन आणि जोडी ग्रिनहॅमचा पराभव केला. शीतल देवीच्या या चमकदार कामगिरीने भारतीय पॅरा तिरंदाजीला अभिमान वाटला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिला ओळख मिळाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे