अबुधाबी, 28 सप्टेंबर (हिं.स.) आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर १४७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या गोलंदाजीमुळे पाकिस्तानचा संघ १९.१ षटकांत १४६ धावांवर ऑलआऊट झाला. पाकिस्तानकडून सलामीवीर साहिबजादा फरहानने सर्वाधिक ५७ धावा केल्या. तर भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
वरुण चक्रवर्तीने साहिबजादा फरहानला बाद करून भारताला पहिली विकेट मिळवून दिली. साहिबजादा आणि फखर जमान यांनी पाकिस्तानला पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी करून चांगली सुरुवात करून दिली होती. पण वरुणने साहिबजादाला बाद करून ही भागीदारी मोडली. ज्यामुळे भारताला सुटकेचा निश्वास सोडला. साहिबजादाने ३८ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५७ धावा केल्या. कुलदीप यादवने साईम अयुबला बाद करून पाकिस्तानला दुसरा धक्का दिला. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर बुमराहने त्याचा कॅच पकडला. अयुब ११ चेंडूत १४ धावा करून बाद झाला. ज्यामध्ये दोन चौकारांचा समावेश होता. पाकिस्तानची तिसरी विकेट अक्षर पटेलने घेतली. भारतासाठी चौथी विकेट वरुण चक्रवर्तीने घेतली. फखर चांगली फलंदाजी करत होता आणि अर्धशतक झळकावण्याच्या जवळ होता. पण वरुणने त्याला कुलदीपकडे कॅच द्यायला भाग पाडलं. फखर ३५ चेंडूत ४६ धावा करून बाद झाला.
हुसेन तलतला बाद करून अक्षर पटेलने पाकिस्तानची पाचवा विकेट घेतली. पाकिस्तानने चांगली सुरुवात केली होती. पण भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले आणि पाकिस्तानला अडचणीत आणले.कर्णधार सलमान आघाला बाद करून कुलदीप यादवने पाकिस्तानची सहावा विकेट घेतली. सलमान ७ चेंडूत आठ धावा करून बाद झाला.कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी केली आणि पाकिस्तानला सातवा धक्का दिला. शाहीन आफ्रिदी खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. कुलदीपची ही सामन्यातील तिसरी विकेट होती. फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने शानदार कामगिरी करत पाकिस्तानला आठवा धक्का दिला. कुलदीपने फहीम अशरफला बाद करून सामन्यातील चौथी विकेट घेतली. अशरफला त्याचे खातेही उघडता आले नाही. अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने हरिस रौफला बाद करून पाकिस्तानला नववा धक्का दिला. पाकिस्तानचा संपूर्ण संघ 146 धावांवर बाद झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे