मुंबई, 28 सप्टेंबर (हिं.स.)माजी क्रिकेटपटू मिथुन मन्हास यांची बीसीसीआयचे नवे अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यता आली आहे. मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या समारोपानंतर मिथुन मन्हास यांची अधिकृतपणे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. रॉजर बिन्नी यांच्यानंतर येणारे मन्हास यांची भारतीय क्रिकेट प्रशासनाचे मार्गदर्शन करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. ज्यांचे ध्येय वाढ, कामगिरी आणि नवोपक्रम यांच्यात संतुलन राखणे आहे. क्रिकेट प्रशासन आणि धोरणात्मक नियोजन या दोन्ही क्षेत्रात व्यापक अनुभव असलेले राजीव शुक्ला यांची उपाध्यक्षपदीही नियुक्ती करण्यात आली आहे. देवजीत सैकिया यांची मानद सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. तर प्रभतेज सिंग भाटिया यांनी संयुक्त सचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे. कोषाध्यक्ष ए. रघुराम भट आर्थिक व्यवस्थापनाचे पर्यवेक्षण करणार आहेत.
मिथुन मन्हास हे भारतीय स्थानिक क्रिकेट खेळले आहेत. ते स्थानिक क्रिकेटमध्ये दिल्ली संघाकडून खेळले होते. १९९७-९८ ते २०१६-१७ या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी १५७ प्रथम श्रेणी सामने, १३० लिस्ट ए सामने आणि ९१ टी-२० सामने खेळले आहेत . त्यांनी एकूण ९,७१४ प्रथम श्रेणी धावा केल्या आहेत.
भारतीय संघाकडून त्यांना खेळण्याची संधी मिळाली नसली तरी, ते दिल्ली डेअरडेव्हिल्स, पुणे वॉरियर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या तीन आयपीएल फ्रँचायझींसाठी खेळले आहेत. त्यांनी अलीकडेच जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे प्रशासक म्हणून काम केले आहे. आणि यापूर्वी दुलीप ट्रॉफीसाठी नॉर्थ झोनचे संयोजक म्हणून काम केले आहे. ते आयपीएलचा संघ गुजरात टायटन्सच्या सपोर्ट स्टाफचा भाग देखील आहेत.
मन्हास यांनी रॉजर बिन्नी यांची जागा घेतली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नियमांनुसार कोणत्याही पदाधिकाऱ्यासाठी कमाल वयोमर्यादा ७० वर्षे असल्याने बिन्नी यांना पद सोडावे लागले होते. माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि रघुराम भट्ट हे देखील शर्यतीत होते. पण मन्हास यांची अखेर निवड झाली. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन समितीचा औपचारिक निर्णय घेण्यात आला.
वार्षिक सर्वसाधारण सभेने महिला निवड समितीच्या अध्यक्षपदी अमिता शर्मा यांची नियुक्ती केली. त्यांनी नीतू डेव्हिड यांची जागा घेतली. ११६ एकदिवसीय सामने खेळलेल्या माजी भारतीय वेगवान गोलंदाज अमिता शर्मा यांच्यासोबत पॅनेलमध्ये श्यामा डे, जया शर्मा आणि श्रवंती नायडू असतील. त्यांचा कार्यकाळ ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या महिला विश्वचषकानंतर सुरू होणार आहे.
बैठकीत इतर अनेक महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले. माजी भारतीय क्रिकेटपटू प्रज्ञान ओझा यांचा एस. शरथ यांच्या जागी राष्ट्रीय वरिष्ठ पुरुष निवड समितीत समावेश करण्यात आला आहे. व्ही.एस. तिलक नायडू यांच्या जागी एस. शरथ यांची ज्युनियर निवड समितीचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुब्रतो बॅनर्जी यांच्या जागी माजी भारतीय वेगवान गोलंदाज आर.पी. सिंग यांचा निवड समितीत समावेश करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे