रायगड, 28 सप्टेंबर, (हिं.स.)। कर्नाटकातील कोप्पल येथे दि. २६ ते २८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या १३ व्या राष्ट्रीय पेनकाक सिलाट मार्शल आर्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत रायगड जिल्ह्याच्या नावावर मोठा मानाचा तुरा मिळाला. नागोठणे येथील अर्णव रावकर याने या स्पर्धेत प्रभावी कामगिरी करत रौप्यपदक पटकावले.
अर्णवने पाचवीत असतानाच या क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण सुरू केले. गेल्या काही महिन्यांपासून त्याने या स्पर्धेसाठी कठोर परिश्रम घेतले होते. जानेवारीपासून सुरू असलेले नियोजनबद्ध प्रशिक्षण आणि गुरु धनंजय जगताप यांचे मार्गदर्शन या यशामागे महत्वाचे ठरले. दिवस-रात्र सराव करून अखेर राष्ट्रीय स्तरावर पदक पटकावण्याचे स्वप्न अर्णवने साकार केले.
या यशाबद्दल कुटुंबीयांनी आनंद व्यक्त करताना गुरुजनांचे आभार मानले. “घरातील कुटुंबियांचा पाठिंबा नसता, तर हे यश शक्य झाले नसते,” अशी भावना अर्णवनेही यावेळी व्यक्त केली.
या स्पर्धेत प्री-टीन, ज्युनियर आणि सिनियर गटातील विविध क्रीडाश्रेणींचा समावेश होता. इंडियन पेनकाक सिलाट फेडरेशन (IPSF) च्या पाठिंब्याने या स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्या. रायगडमधील एका खेळाडूने राष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश संपादन केल्याने जिल्ह्यात सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके