
तेहरान, 10 जानेवारी (हिं.स.) : इराणमध्ये महागाई आणि चलन संकटाच्या विरोधात भडकलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. या आंदोलनांना रोखण्यासाठी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिला आहे. या गोळीबारात 217 आंदोलकांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये बहुसंख्य तरुणांचा समावेश आहे.
तेहरानमध्ये इराण सरकारविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांदरम्यान हिंसाचारात मोठी वाढ झाली आहे. आंदोलन उग्र होत असल्याचे पाहून सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी सुरक्षा दलांना गोळीबाराचे आदेश दिल्याचा दावा केला जात आहे. या कारवाईत 217 आंदोलक ठार झाल्याचे सांगितले जात आहे. एका रुग्णालयाच्या हवाल्याने पुढे आलेल्या माहितीनुसार राजधानीतील केवळ 6 रुग्णालयांमध्येच किमान 217 आंदोलकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी बहुतेकांचा मृत्यू गोळी लागून झाला आहे. मृतांविषयी माहिती देताना डॉक्टरांनी सांगितले की, मृतांमध्ये बहुसंख्य तरुण आहेत. उत्तर तेहरानमधील एका पोलीस ठाण्याबाहेर सुरक्षा दलांनी आंदोलकांवर मशीनगनने अंदाधुंद गोळीबार केला, त्यात अनेकांचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान, वॉशिंग्टन डीसी येथील एका संस्थेने आंदोलन सुरू झाल्यापासून आतापर्यंत किमान 63 मृत्यूंची पुष्टी केली आहे.
मृतांचा आकडा अधिकृतरीत्या निश्चित झाला, तर गुरुवारी रात्रीपासून देशभरात इंटरनेट आणि फोन सेवा जवळपास पूर्णपणे बंद केल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी यापूर्वीच इशारा दिला होता की 28 डिसेंबरपासून रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांवर सरकारने गोळीबार केला, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. जर इराणने गोळीबार करून शांततामय आंदोलकांना ठार केले तर अमेरिका त्यांना वाचवण्यासाठी पुढे येईल. आम्ही तयार आहोत असे ट्रम्प यांनी बजावले होते. उल्लेखनीय म्हणजे, इराणमध्ये महागाई, घसरते चलन आणि आर्थिक अडचणींविरोधात जनतेचा संताप उसळला असून देशभर आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन इराणच्या सर्व 31 प्रांतांमध्ये पसरले आहे. आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ट्रंप यांच्या धमकीमुळे परिस्थिती अधिकच तणावपूर्ण झाली आहे. त्याचवेळी इराणनेही कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी ट्रंप यांच्यावर तीव्र टीका करत म्हटले की, इस्लामिक प्रजासत्ताक ट्रंप यांना खुश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दंगलखोरांसमोर झुकणार नाही. दरम्यान, इराण सरकारने जाहीर केले आहे की आंदोलकांना मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते. सरकारी दूरदर्शनवर इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्डच्या एका अधिकाऱ्याने पालकांना इशारा देत आपल्या मुलांना आंदोलनांपासून दूर ठेवण्यास सांगितले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी