युक्रेन हल्ल्यात रशियाकडून पहिल्यांदाच ओरेशनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर
मॉस्को , 09 जानेवारी (हिं.स.)। रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात तणाव आणखी वाढला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेनवर करण्यात आलेल्या ताज्या हल्ल्यात नवीन ‘ओरेशनिक’ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आल्याची पुष्टी केली
युक्रेन हल्ल्यात रशियाने पहिल्यांदाच ओरेश्निक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र वापरले


मॉस्को , 09 जानेवारी (हिं.स.)। रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात तणाव आणखी वाढला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेनवर करण्यात आलेल्या ताज्या हल्ल्यात नवीन ‘ओरेशनिक’ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आल्याची पुष्टी केली आहे. या हल्ल्यात कीवमध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून किमान २२ जण जखमी झाले आहेत.

ओरेशनिक क्षेपणास्त्राने नेमके कोणते लक्ष्य भेदले, याची अधिकृत माहिती रशियाने दिलेली नाही. मात्र रशियन माध्यमांच्या माहितीनुसार, या क्षेपणास्त्राचा मारा युक्रेनच्या पश्चिमेकडील लविव प्रांतातील एका विशाल भूमिगत नैसर्गिक वायू साठवण केंद्रावर करण्यात आला. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, हा हल्ला मागील महिन्यात युक्रेनी ड्रोनद्वारे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या कथित हल्ल्याच्या प्रत्युत्तरात करण्यात आला. तथापि, युक्रेन तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

लविवचे महापौर आंद्रेई सादोवी यांनी सांगितले की, रशियाने महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य केले, मात्र त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली नाही. या क्षेपणास्त्राचा वेग सुमारे १३,००० किलोमीटर प्रतितास इतका होता. ओरेशनिक क्षेपणास्त्राची पहिली चाचणी नोव्हेंबर २०२४ मध्ये युक्रेनमधील एका कारखान्यावर करण्यात आली होती. पुतिन यांच्या मते, ओरेशनिकच्या मल्टीपल वॉरहेड्सचा वेग मॅक १० पर्यंत असतो आणि ते अडवता येत नाही. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यासही सक्षम आहे.

या हल्ल्यानंतर कीवमध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये एका आपत्कालीन वैद्यकीय कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. हल्ल्याच्या ठिकाणी बचावकार्य करत असताना पाच बचावकर्मी जखमी झाले. या हल्ल्यामुळे कीवमधील अनेक भागांत पाणीपुरवठा आणि वीजखंडित झाली आहे. देसन्यांस्की जिल्ह्यात एक ड्रोन बहुमजली इमारतीच्या छतावर कोसळला, तर डनिप्रो जिल्ह्यात ड्रोनमुळे आग लागून इमारतीचे नुकसान झाले.

या हल्ल्याच्या काही तास आधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाकडून मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला होता. त्यांनी सांगितले की, रशिया राजधानीतील थंड हवामानाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे रस्ते घसरडे झाले असून परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande