
अमरावती, 12 जानेवारी (हिं.स.) महानगरपालिका निवडणुकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून, सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. सत्तेवर दावा सांगण्यासाठी प्रत्येक पक्षाने ताकदवान व प्रभावी उमेदवार मैदानात उतरवले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या एकूण २२ प्रभागांपैकी तब्बल १८ प्रभागांमध्ये अत्यंत चुरशीची, म्हणजेच ‘काट्याची’ लढत होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.या निवडणुकीत अनेक प्रभागांमध्ये माजी नगरसेवक, माजी महापौर, अनुभवी पदाधिकारी तसेच नवोदित युवा नेते आमने-सामने उभे ठाकले आहेत. काही प्रभागांमध्ये तर दोन-दोन माजी नगरसेवकांमध्ये थेट सामना होत असल्याने वातावरण अधिकच तापले आहे. तर काही ठिकाणी पक्षांनी तरुण उमेदवारांना संधी देत अनुभवी नेत्यांना आव्हान दिले आहे.उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार, खासदार तसेच विविध पक्षांचे स्टार प्रचारक मैदानात उतरले आहेत. त्यामुळे प्रचाराला अधिकच वेग आला असून, प्रत्येक प्रभागात सभा, कॉर्नर मीटिंग्स, पदयात्रा, घरभेटी यांचा धडाका सुरू आहे.
आमदार, पदाधिकाऱ्यांचे नातेवाईकही रिंगणात
अमरावती मनपा निवडणुकीत एकूण ६६१ उमेदवार रिंगणात आहेत. २२ प्रभागांतून ८७ सदस्य निवडण्यासाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांचे नातेवाईकही उमेदवार म्हणून उभे असल्याने चर्चा रंगली आहे. भाजपचे विधानपरिषद आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय हे साईनगर प्रभागातून निवडणूक लढवत आहेत. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांच्या पत्नी स्मिता सूर्यवंशी या स्वामी विवेकानंद कॉलनी प्रभागातून भाजपच्या उमेदवार आहेत. याशिवाय इतरही अनेक पक्षांतील स्थानिक नेत्यांचे नातेवाईक विविध प्रभागांतून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.पहिल्यांदाच राजकारणात उतरणारेही सक्षममहापालिकेच्या रणांगणात उतरलेल्या अनेक उमेदवारांनी यंदा पहिल्यांदाच राजकारणात पाऊल टाकले आहे. मात्र, त्यांची तयारी आणि प्रचाराची पद्धत पाहता ते अनुभवी नेते व कार्यकर्त्यांना चांगलेच टक्कर देताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये निकाल शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चित राहण्याची शक्यता आहे.
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात चुरस
आता प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने सर्वच पक्ष आणि उमेदवारांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. फोनाफोनी, वैयक्तिक संपर्क, प्रभावशाली व्यक्तींशी चर्चा अशा सर्व मार्गांचा वापर केला जात आहे. समर्थक आपल्या-आपल्या भागातील प्रभावी नागरिकांना थेट फोन करून उमेदवाराच्या विजयासाठी मदतीची विनंती करत आहेत.राजकीय जाणकारांच्या मते, पुढील दोन-तीन दिवसांत वातावरण व समीकरणे कोणत्याही क्षणी बदलू शकतात. काही प्रभागांमध्ये पक्षांतर केलेले नेते एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र आहे.काही प्रभागांतील लक्षवेधी लढतीअमरावती मनपा निवडणुकीतील काही प्रभागांमध्ये विशेष लक्षवेधी सामने होत आहेत. प्रभाग क्रमांक १४ मध्ये उबाठा सेनेचे माजी नगरसेवक प्रवीण हरमकर आणि त्यांची पत्नी विशाखा हरमकर हे दोघेही निवडणूक लढवत आहेत. अमरावतीत पती-पत्नी एकाच वेळी निवडणूक लढवत असलेले हे एकमेव उदाहरण ठरत आहे.प्रभाग क्रमांक २, १०, १३, १४, १५, १८, १९, २०, २२ आदी प्रभागांमध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार), उबाठा सेना, शिंदे सेना, रिपाइं (आठवले), युवा स्वाभिमान, वंचित बहुजन आघाडी, बसपा अशा विविध पक्षांचे दिग्गज उमेदवार एकमेकांसमोर उभे आहेत.एकूणच, अमरावती महानगरपालिका निवडणूक यंदा अत्यंत रोचक, चुरशीची आणि अनिश्चित निकालांची ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. १८ प्रभागांतील दिग्गज उमेदवारांमुळे ही निवडणूक शहराच्या राजकारणात नवा इतिहास रचणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी