
लातूर, 12 जानेवारी (हिं.स.)।
लोकशाही हा आपल्या देशाचा आत्मा असून निवडणूक ही त्या लोकशाहीची सर्वात महत्त्वाची आणि पवित्र प्रक्रिया आहे. निवडणुकीदरम्यान प्रत्येक नागरिकाला निर्भय, सुरक्षित आणि शांत वातावरणात मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी पोलीस प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, कोणत्याही अनुचित प्रकारास वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ करण्यासाठी लातूर पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याचा ठाम संदेश देण्याच्या उद्देशाने दंगा काबू योजनेची रंगीत तालीम व रूट मार्चचे आयोजन करण्यात आले.
पोलीस अधीक्षक श्री.अमोल तांबे यांचे आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात श्री. समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर यांच्या नेतृत्वाखाली दंगा काबू योजनेची रंगीत तालीम यशस्वीपणे पार पडली. या तालीममध्ये गांधी चौक, शिवाजीनगर, एमआयडीसी व विवेकानंद चौक पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, 10 दुय्यम अधिकारी, 53 पोलीस अंमलदार तसेच 1 आरसीपी प्लाटून सहभागी झाले. या रंगीत तालीमदरम्यान दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी, जमाव कसा नियंत्रित करावा, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कायदेशीर मार्गाने परिस्थिती कशी हाताळावी, तसेच विविध विभागांमधील समन्वय कसा साधावा याचे प्रात्यक्षिक स्वरूपात सादरीकरण करण्यात आले. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी ते पूर्णपणे सज्ज आहे.
दंगा काबू योजनेची रंगीत तालीम पूर्ण झाल्यानंतर दुपारी गंजगोलाई ते सुभाष चौक, अंबिका मंदिर, पोस्ट ऑफिस मार्गे पोलीस स्टेशन गांधी चौक असा रूट मार्च घेण्यात आला. हा रूट मार्च केवळ पोलीस दलाच्या तयारीचे प्रदर्शन नसून, तो समाजातील प्रत्येक घटकासाठी एक सकारात्मक संदेश होता. “पोलीस तुमच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहेत” हा विश्वास नागरिकांच्या मनात अधिक दृढ करण्यासाठीच हा उपक्रम राबविण्यात आला.
या रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये कायदा व सुव्यवस्थेबाबत जागरूकता निर्माण झाली. समाजकंटक, अफवा पसरविणारे, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणारे घटक यांना स्पष्ट आणि ठाम संदेश देण्यात आला की, निवडणूक काळात कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार, हिंसाचार किंवा कायद्याचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही. पोलीस प्रशासन प्रत्येक परिस्थितीला समर्थपणे सामोरे जाण्यास सज्ज आहे.
*लातूर पोलीस प्रशासन नागरिकांना आवाहन करते की,* निवडणुकीदरम्यान शांतता, सौहार्द व सामाजिक सलोखा राखावा. अफवांवर विश्वास ठेवू नये, कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास त्वरित पोलीस प्रशासनास कळवावे. मतदानाचा हक्क निर्भय वातावरणात बजावण्यासाठी पोलीस दल तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
ही रंगीत तालीम व रूट मार्च म्हणजे केवळ एक सराव नव्हे, तर लोकशाही मूल्यांप्रती असलेली पोलीस प्रशासनाची कटिबद्धता आहे. “सुरक्षित निवडणूक, शांत समाज आणि सशक्त लोकशाही” या उद्दिष्टासाठी लातूर पोलीस दल अविरतपणे कार्यरत असून, प्रत्येक नागरिकाच्या सहकार्यानेच ही प्रक्रिया अधिक प्रभावी व यशस्वी होऊ शकते, असा विश्वास या माध्यमातून व्यक्त करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis