छत्रपती संभाजीनगर-पाच ते आठ मार्च दरम्यान शहरात राज्यस्तरीय 'डिपेक्स' प्रदर्शन
छत्रपती संभाजीनगर, 12 जानेवारी (हिं.स.)अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन आणि आयटीआय शाखांच्या विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना चालना देणारा ३५ वे ''डिपेक्स राज्यस्तरीय स्पर्धात्मक प्रदर्शन'' पाच ते आठ मार्च रोजी एमआयटी महाविद्यालयात होणार आहे. विभागीय स्तरा
छत्रपती संभाजीनगर-पाच ते आठ मार्च दरम्यान शहरात राज्यस्तरीय 'डिपेक्स' प्रदर्शन


छत्रपती संभाजीनगर, 12 जानेवारी (हिं.स.)अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन आणि आयटीआय शाखांच्या विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना चालना देणारा ३५ वे 'डिपेक्स राज्यस्तरीय स्पर्धात्मक प्रदर्शन' पाच ते आठ मार्च रोजी एमआयटी महाविद्यालयात होणार आहे. विभागीय स्तरावर प्रकल्पांची पाहणी करुन महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील दोन हजार नोंदणीकृत प्रकल्पांपैकी ४०० उत्कृष्ट प्रकल्प प्रदर्शनात असतील, अशी माहिती स्वागत समितीचे मार्गदर्शक सदस्य रामचंद्र भोगले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व सृजन ट्रस्ट यांच्या वतीने 'डिपेक्स' राज्यस्तरीय विज्ञान, तंत्रज्ञान व औद्योगिक नवकल्पनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या वतीने ३५ वे डिपेक्स प्रदर्शन होईल. प्रदर्शन 'प्रकल्प ते उत्पादन' संकल्पनेवर आधारीत आहे. यात भविष्यवेधी तंत्रज्ञान, उद्योजकता अशा विषयांवर परिसंवाद, चर्चासत्रे होतील. विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, सामाजिक विज्ञान, औद्योगिक क्षेत्रातील प्रकल्पांद्वारे विद्यार्थी समाजासमोरील प्रश्नांवर उपाय सुचवितात. ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला असल्याचे संयोजकांनी सांगितले.

या प्रदर्शनाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष अपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे आहेत. कार्याध्यक्ष मुनीष शर्मा, उपाध्यक्ष अतुल चव्हाण, मैथिली तांबोळकर, निखिल खिंवसरा, राहुल पगारिया, केदार देशपांडे, खासदार डॉ. भागवत कराड, उमेश दाशरथी, रामचंद्र भोगले, ऋषी बागला, मानसिंग पवार, बी. एस. खोसे, डॉ. अनंत पंढरे, प्रवीण घुगे, मोहिनी केळकर आदींचा समावेश आहे.'चार दिवसांच्या प्रदर्शनात ४०० प्रकल्पांसोबत दीड हजार विद्यार्थी सहभागी असतील. नियोजनासाठी 'अभाविप'चे ४०० कार्यकर्ते, २०० विद्यार्थी स्वयंसेवक असतील. तर ५० हजार लोकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असे उद्दिष्ट आहे,' असे भोगले म्हणाले. या वेळी डॉ. अनंत पंढरे, प्रा. योगिता पाटील, कनक कवडीवाले, वैभवी ढिवरे आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande