
अकोला, 12 जानेवारी (हिं.स.)।
नरनाळा किल्ल्याच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाचे जतन, तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी दि. 30 जानेवारी ते दि. 1 फेब्रुवारी दरम्यान ‘नरनाळा महोत्सव’ साजरा करण्यात येत असून, त्यात बहुविध कार्यक्रमांची रेलचेल असेल. अधिकाधिक नागरिक, पर्यटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले.
नरनाळा महोत्सवाच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांची पत्रकार परिषद जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. उपवनसंरक्षक राहुल तोलिया, उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, नरनाळा महोत्सवाच्या माध्यमातून नरनाळा येथील समृद्ध इतिहास, संस्कृती व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे. महोत्सवात जंगल सफारी, ट्रेकिंग, नरनाळा किल्ला सफर अशा निसर्गानुभव देणारे उपक्रम तिन्ही दिवस होतील. दि. 30 जानेवारी रोजी स. 7 वाजता ‘पर्यावरणासाठी एक धाव’ ही थीम घेऊन 12 कि. मी. अंतराची मॅराथॉन होणार आहे. दि. 31 जानेवारी रोजी स. 8.30 ते 11.30 वा. चित्रकला स्पर्धा होणार आहे.
महोत्सवात वन्यजीवन छायाचित्र स्पर्धा तिन्ही दिवस स. 8.30 ते 11.30 वा. या वेळेत होईल. महोत्सवात प्रत्येक दिवशी सायं. 5 ते 10 वा. या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम, दुस-या दिवशी ‘शिवशंभो गर्जना’ आणि गायिका रूपाली जग्गा यांची लाईव्ह इन कॉन्सर्ट, तसेच तिस-या दिवशी प्रसिद्ध गायक कैलास खेर यांची लाईव्ह इन कॉन्सर्ट होणार आहे.
त्याचप्रमाणे, स्थानिक कलावंतांचा महोत्सवात सहभाग राहणार असून, विविध कार्यक्रम होणार आहेत. नरनाळा महोत्सव जिल्ह्याची ओळख, इतिहास आणि सांस्कृतिक अस्मिता जपणारा हा महोत्सव आहे. महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे