
अकोला, 12 जानेवारी (हिं.स.)।
लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ च्या परिच्छेद १३५ (बी) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. त्यानुसार दि. १५ जानेवारी रोजी महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्यासाठी आस्थापना व उद्योगांनी आपल्या कर्मचा-यांना भरपगारी सुट्टी द्यावी, असे निर्देश सहायक कामगार आयुक्त रा. रा. काळे यांनी दिले आहेत.
काही संस्था/आस्थापना इ. त्यांच्या कामगारांना भरपगारी सुट्टी किया सवलत देत नाहीत. त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित रहावे लागते. हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. असे निदर्शनास आल्यास आस्थापनांवर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
हा आदेश खाजगी कंपन्या, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी, हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिग सेंटर, मॉल्सर, रिटेलर्स आदी सर्वांना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे