
अकोला, 12 जानेवारी (हिं.स.)।
महाराष्ट्र विधानपरिषद शिक्षक मतदारसंघाची अकोला जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी जिल्हा, उपविभागीय, तसेच तहसील कार्यालय स्तरावर आज प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये एकूण 5 हजार 379 मतदारांचा समावेश आहे.
महाराष्ट्र विधान परिषद शिक्षक मतदार संघासाठी दिनांक 01.11.2025 या अर्हता दिनांकावर मतदार यादी तयार करण्याचे सुधारित वेळापत्रकानूसार प्रारुप मतदार यादी दिनांक 3.12.2025 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. त्यामध्ये एकूण 4 हजार 883 मतदारांचा समावेश होता.
मतदार नोंदणी कार्यक्रमानूसार दि. 3.12.2025 ते 18.12.2025 या दरम्यान अकोला जिल्ह्यामध्ये पदनिर्देशित अधिकारी तथा तहसिलदार यांचे स्तरावर प्राप्त दावे व हरकतीवर नियमानुसार कार्यवाही करुन दिनांक 12.01.2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. त्यामध्ये एकूण 5 हजार 379 मतदारांचा समावेश आहे.
अमरावती विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी सुधारित वेळापत्रकानुसार आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालय तसेच अकोला जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय, तहसिलदार तथा पदनिर्देशित अधिकारी यांचे कार्यालयाव्दारे अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर मतदार यादी नागरीकांना अवलोकना करीता कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. अंतिम मतदार यादी अकोला जिल्हयाचे संकेतस्थळ akola.gov.in येथे मराठी व इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे.
मतदार नोंदणी मध्ये अद्याप पात्र शिक्षक नांव नोंदणी करण्यास कोणी राहीले असल्यास / इच्छुक असल्यास निरंतर पुनरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत अमरावती विभाग शिक्षक मतदार संघामध्ये नोंदणी करु शकतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे