अहमदपूर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवायांत पकडले ६५ लाखांचे वाळूचे टिप्पर; तिघांवर गुन्हे दाखल
लातूर, 12 जानेवारी (हिं.स.)। पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी मोठी मोहीम उघडली असून, दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण ६५ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पहिली कारवाई ९ जानेवारी रोजी रात्री ९:१५ च्या
अहमदपूर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवायांत पकडले ६५ लाखांचे वाळूचे टिप्पर; तिघांवर गुन्हे दाखल


लातूर, 12 जानेवारी (हिं.स.)।

पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी मोठी मोहीम उघडली असून, दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण ६५ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पहिली कारवाई ९ जानेवारी रोजी रात्री ९:१५ च्या सुमारास अहमदपूर-लातूर हायवेवरील शिरूर ताजबंद परिसरात करण्यात आली. यावेळी पोलिसांनी विनापरवाना वाळूची वाहतूक करणारे दोन हायवा टिप्पर (क्रमांक MH 44 U 4555 आणि MH 04 KF 5529) पकडले. या कारवाईत १० ब्रास वाळू आणि दोन टिप्पर असा एकूण ४० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी चालक निजाम रसूल सय्यद (रा. चाकूर) व रामेश्वर प्रभाकर भोसले (रा. अहमदपूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार साळवे करत आहेत.

​दुसऱ्या एका कारवाईत, ३० डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास चामे गार्डन समोरून अवैध वाळू घेऊन जाणारा एक पिवळ्या रंगाचा भारत बेंझ हायवा टिप्पर (क्रमांक MH 26 CH 2409) पकडण्यात आला. यामध्ये २५ लाख रुपयांचा टिप्पर आणि २५ हजार रुपये किमतीची ५ ब्रास वाळू असा एकूण २५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, चालक पुंडलीक श्रीपती कदम (रा. शेलगाव, जि. नांदेड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार पवार हे करत आहेत.

​या दोन्ही कारवाया पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या असून, दोन्ही प्रकरणांत पोलीस हवालदार गंगाधर व्यंकट चपडे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या कलम १५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बेकायदेशीर गौण खनिजाची चोरी करणाऱ्यांविरुद्ध अहमदपूर पोलिसांनी घेतलेल्या या कडक भूमिकेमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande