कागदोपत्री भांडण, प्रत्यक्षात साटेलोटे; ‘ – आ. साजिद खान पठाण
अकोला, 12 जानेवारी (हिं.स.)। एकमेकांवर जहरी आरोपांची भाषा वापरणारे, सभांमध्ये एकमेकांना देशद्रोही ठरवणारे आणि मतदारांसमोर कट्टर विरोधक असल्याचा आव आणणारे एमआयएम आणि भारतीय जनता पक्ष प्रत्यक्षात मात्र सत्तेसाठी एकाच माळेचे मणी असल्याचा गंभीर आरोप प
कागदोपत्री भांडण, प्रत्यक्षात साटेलोटे; ‘ – आ. साजिद खान पठाण


अकोला, 12 जानेवारी (हिं.स.)।

एकमेकांवर जहरी आरोपांची भाषा वापरणारे, सभांमध्ये एकमेकांना देशद्रोही ठरवणारे आणि मतदारांसमोर कट्टर विरोधक असल्याचा आव आणणारे एमआयएम आणि भारतीय जनता पक्ष प्रत्यक्षात मात्र सत्तेसाठी एकाच माळेचे मणी असल्याचा गंभीर आरोप पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी केला आहे. अकोट नगर परिषदेत घडलेल्या सत्तानाट्यावरून एमआयएम आणि भाजप हे कागदोपत्री वेगळे, पण पडद्यामागून ‘भाऊ–भाऊ’ असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले असल्याची घणाघाती टीका त्यांनी सोमवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली.

अकोट नगर परिषदेत सत्तास्थापनेसाठी ५ जानेवारी रोजी ‘अकोट नगर विकास आघाडी’च्या नावाखाली भाजप आणि एमआयएम नगरसेवकांनी हातमिळवणी केली होती. बहुतमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला एमआयएमची साथ आवश्यक होती आणि सत्तेच्या मोहापोटी एमआयएमने भाजपच्या खांद्यावर बंदूक ठेवली. हा प्रकार उघडकीस येताच संपूर्ण राज्यभरातून तीव्र संतापाची लाट उसळली. भाजप आणि एमआयएम या दोन्ही पक्षांवर ‘दुटप्पी राजकारण’ केल्याचा आरोप होऊ लागला.

एकीकडे सभागृहात आणि जाहीर सभांमध्ये एकमेकांविरोधात विखारी टीका, तर दुसरीकडे सत्तेसाठी एकाच ताटात जेवण—या ढोंगी राजकारणामुळे मतदारांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला. वाढता विरोध पाहता दोन्ही पक्षांच्या प्रदेशस्तरीय नेत्यांनी पत्रे, नोटिसा काढत नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न केला आणि प्रकरण थंड करण्याचा देखावा उभा केला.

९ जानेवारी रोजी एमआयएमच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत आघाडीतून बाहेर पडल्याचे जाहीर केले आणि स्वतंत्र गट स्थापन केल्याचे दाखवण्यात आले. मात्र हा सारा प्रकार केवळ ‘डॅमेज कंट्रोल’पुरताच मर्यादित असल्याचे सोमवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

वाद शमतो न शमतो, तोच याच एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी भाजप पदाधिकारी बरेठिया याला पाठिंबा देत थेट नगर परिषद सभागृहात स्वीकृत सदस्य म्हणून एन्ट्री मिळवून दिली. कागदोपत्री वेगळा गट, पण प्रत्यक्षात भाजपाच्या फायद्यासाठी निर्णायक भूमिका—यामुळे एमआयएमचा खरा चेहरा जनतेसमोर आला असल्याचा आरोप आ. पठाण यांनी केला.

“एमआयएम आणि भाजप एकमेकांचे कट्टर शत्रू असल्याचा देखावा करत असले, तरी सत्ता आणि पदांसाठी हे दोन्ही पक्ष एकमेकांचे हात घट्ट धरून आहेत. मतदारांची दिशाभूल करणे, समाजात ध्रुवीकरण घडवणे आणि निवडणुकीपुरते भांडणाचे नाटक करणे, हा यांचा जुना खेळ आहे,” असा घणाघात आमदार साजिद खान पठाण यांनी केला.

या संपूर्ण प्रकरणामुळे अकोटच्या राजकारणात खळबळ उडाली असून, ‘एमआयएम–भाजप साटेलोटे’ हा मुद्दा आता उघडपणे चर्चेत आला आहे. जनता सर्व काही पाहत आहे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये या दुटप्पी राजकारणाला चोख प्रत्युत्तर देईल, असा विश्वासही आ. पठाण यांनी व्यक्त केला.

काँग्रेसचे धाडस, भाजप–एमआयएमचे ढोंग

अंबरनाथ येथे भाजपासोबत आघाडीत सामील झालेल्या १२ नगरसेवकांना काँग्रेसने थेट निलंबित करून कारवाई केली. अकोटमध्ये मात्र साटेलोटे उघडकीस येऊनही भाजप आणि एमआयएम केवळ नोटिसा काढण्याचे ढोंग करत आहेत. काँग्रेसप्रमाणे नगरसेवकांवर थेट कारवाई करण्याचे धाडस दाखवावे, असे आव्हान आमदार साजिद खान पठाण यांनी भाजप आणि एमआयएमच्या नेत्यांना दिले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande