
अमरावती, 12 जानेवारी (हिं.स.)।
‘गोल्ड बॉण्ड’ व ‘डिजिटल गोल्ड’च्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. रिद्धी ज्वेलर्सचा संचालक सतीशचंद्र एकनाथ बहाड याने तीन वर्षांत गुंतवलेली रक्कम व सोने दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून अनेक नागरिकांकडून तब्बल ८८ लाख ९० हजार रुपये तसेच मोठ्या प्रमाणात सोने जमा करून त्याची अफरातफर केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रकाशसिंग नारायणसिंग बैस, चंद्रशेखर मधुकराराव काळे, प्रदीप श्रीकृष्णराव इंगोले, संतोष भाऊराव शेकार, पंजाबराव श्रावणजी गुर्जर, शीतल महेशराव आसरकर, दीनेश रमेशराव गावनेर, प्रविण दिलीपराव भस्मे यांच्यासह इतर नागरिकांनी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, सतीशचंद्र बहाड गेल्या १० ते १५ वर्षांपासून नांदगाव पेठ येथे सराफा व्यवसाय करत असल्याने गावात त्याची विश्वासार्ह प्रतिमा होती. याच विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने बँकेपेक्षा अधिक परतावा, स्वस्त दरात सोने तसेच सरकारच्या ‘गोल्ड बॉण्ड’ व ‘डिजिटल गोल्ड’ योजनांमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवले. “जेवढी रक्कम किंवा सोने गुंतवाल, ते तीन वर्षांत दुप्पट करून देऊ,” अशी कथित बनावट योजना नागरिकांसमोर मांडण्यात आल्याचा आरोप आहे.या आमिषाला बळी पडून अनेक नागरिकांनी आपले सोने, तर काहींनी रोख रक्कम रिद्धी सिद्धी ज्वेलर्सकडे जमा केली.
तक्रारीत नमूद अधिकृत रक्कम ८८.९० लाख रुपये असली, तरी प्रत्यक्षात काही प्रतिष्ठित नागरिकांनी प्रत्येकी ५० ते ७० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केल्याचा दावा असून, एकूण रक्कम १५ कोटी रुपयांपेक्षा अधिक असण्याची शक्यता तक्रारदारांनी व्यक्त केली आहे. नागरिकांनी गुंतवणुकीची पावती किंवा गोल्ड बॉण्डची मागणी केली असता, “माझ्यावर विश्वास नाही का?” असे म्हणत वेळ मारून नेण्यात आली. त्यानंतर आरोपीने आजारपणाचे कारण सांगून दुकानातील साहित्य घेऊन पसार झाल्याचा आरोप आहे.काही तक्रारदारांनी पैसे परत मागितल्यानंतर आरोपीने बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया येथील असल्याचे सांगून चेक दिले. मात्र हे चेक बँकेत सादर केल्यानंतर खात्यात पुरेशी रक्कम नसल्याचे समोर आले. कायदेशीर नोटीस दिल्यानंतर, आरोपीच्या वकिलांकडून मिळालेल्या उत्तरात हे दस्तऐवज अधिकृत चेक नसून चेकसारखे दिसणारे विड्रॉल स्लिप असल्याचे स्पष्ट झाल्याचा धक्कादायक दावा तक्रारीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अशाच प्रकारच्या विड्रॉल स्लिप इतर अनेक नागरिकांनाही देण्यात आल्याचा आरोप असून, ही बाब संबंधित बँकांच्या काही शाखांना माहिती असूनही फसवणूक रोखण्यासाठी ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा गंभीर आरोप तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे बँक अधिकाऱ्यांच्या संभाव्य संगनमताचीही चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.या प्रकरणी सखोल तपास करून आरोपीकडील हिशोबाची रजिस्टर जप्त करावीत, फसवलेली रक्कम व सोने पीडितांना परत मिळवून द्यावे तसेच दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी तक्रारदार नागरिकांकडून करण्यात येत आहे. नांदगाव पेठ पोलिसांनी तक्रारीच्या आधारावर पीडित फसवणूक झालेल्या नागरिकांचे बयान नोंदविणे सुरू आहे. घटनेमुळे नांदगाव पेठ परिसरात खळबळ उडाली असून पुढील पोलीस कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी