अमरावतीत भाजपचे 15 बंडखोर पक्षातून निलंबित
अमरावती, 12 जानेवारी (हिं.स.)। मतदानाच्या तोंडावर आणखी एक धमाका दीर्घ प्रतीक्षेनंतर होत असलेली महापालिका निवडणूक अनेक अर्थानी आगळी वेगळी ठरताना दिसत आहे. आरोप-प्रत्यारोप, चित्र-विचित्र युत्या आणि आघाड्या, पक्षांतर आदी विविध गोष्टींमुळे ही निवडणूक
अखेर भाजपचे 15 बंडखोर पक्षातून निलंबित  शहर जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांची कारवाई


अमरावती, 12 जानेवारी (हिं.स.)।

मतदानाच्या तोंडावर आणखी एक धमाका दीर्घ प्रतीक्षेनंतर होत असलेली महापालिका निवडणूक अनेक अर्थानी आगळी वेगळी ठरताना दिसत आहे. आरोप-प्रत्यारोप, चित्र-विचित्र युत्या आणि आघाड्या, पक्षांतर आदी विविध गोष्टींमुळे ही निवडणूक रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. आता पक्षाने तिकीट नाकारल्याने भाजपविरूद्ध शड्डू ठोकून दुसरा मार्ग निवडणाऱ्या तब्बल १५ उमेदवारांवर भारतीय जनता पक्षाने पक्षशिस्त मोडल्याचा ठपका ठेवत निष्कासनाची कारवाई केली. मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी १५ बंडखोरांच्या हाती रविवार ११ जानेवारीला निलंबनाचे पत्र दिल्याने या निवडणुकीला अधिकच धार आली आहे.

या १५ जणांचा समावेश

तिकीट वाटपात अन्याय झाल्याचा आरोप करीत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते योगेश वानखडे, विवेक चुटके, धनराज चक्रे, मेघा हिंगासपुरे, सतीश करेसिया, सचिन पाटील, किशोर जाधव, गौरी मेघवानी, शिल्पा पाचघरे, ज्योती वैद्य, संजय वानरे, संजय कटारिया, दीपक गिरोळकर, रश्मी नावंदर, अनिषा मनीष चौबे, तुषार वानखडे, श्रद्धा गहलोत ठाकूर यांनी बंडखोरी केली होती.

उघडपणे बंडखोरी...

तिकिट वाटपात पक्षपात झाल्याचा ठपका ठेवत उपरोक्त कार्यकर्त्यांपैकी काहींनी शिवसेना शिंदे गट, काहींनी युवा स्वाभिमान पक्ष तर काहींनी राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करून भाजप विरोधात निवडणूक मैदानात उडी घेतली, हा प्रकार पक्षशिस्त मोडणारा असल्याने या पंधरा कार्यकर्त्यांना ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाचे सदस्य असताना देखिल या कार्यकर्त्यांनी पक्ष हिताला धक्का पोहोचेल असे कृत्य केले असून पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात उघडपणे बंडखोरी केली आहे.

शहराध्यक्षांच्या स्वाक्षरीने पत्र

पक्षाच्या निर्णयांना आव्हान देणारा हा प्रकार असल्याने यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचा उल्लेख उपरोक्त १५ जणांना जारी करण्यात आलेल्या निलंबन पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे पक्षाच्या अधिकृत अधिकारांतर्गत व वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्देशांनुसार सर्व बंडखोरांना भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांवरून निलंबित करण्यात येत असल्याचा उल्लेख या पत्रात आहे. भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी ही कारवाई केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande