
अमरावती, 12 जानेवारी (हिं.स.)।
मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत येणाऱ्या दौंड-मनमाड विभागातील दौंड आणि काष्टी स्थानकांदरम्यान रेल्वे मार्ग दुहेरीकरणांतर्गत प्री-नॉन इंटर लॉकिंग (प्री-एनआय) आणि नॉन-इंटरलॉकिंग (एनआय) कामासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जात आहे. त्यामुळे २३ ते २५ जानेवारीला अमरावती-पुणे-अमरावती या सर्वच एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही गाड्यांचे मार्ग परिवर्तन करण्यात आले असून काही गाड्यांची वेळ पुर्ननिर्धारित करण्यात आली आहे.
गाडी क्र. ११०२५ पुणे-अमरावती एक्सप्रेस २४ व २५ रोजी तर गाडी क्र. ११०२६ अमरावती-पुणे एक्सप्रेस २३ व २४ जानेवारी रोजी रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे साप्ताहिक गाडी क्र.१२१२० अमरावती-पुणे एक्सप्रेस २५ रोजी रद्द करण्यात आली आहे. बडनेरा स्थानकावरून पुणे येथून नागपूरकरव नागपूरकडून पुण्याकडे जाणाऱ्या गाडी क्र. १२११३ पुणे-नागपूर गरीब रथ एक्सप्रेस २४ रोजी, गाडी क्र.१२११४ नागपूर-पुणे गरीब रथ एक्सप्रेस २३ रोजी रद्द झाली आहे. गाडी क्र. २२१३९ पुणे-अजनी हमसफर एक्सप्रेस २४ रोजी, गाडी क्र.२२९४० अजनी-पुणे हमसफर एक्सप्रेस २५ रोजी, गाडी क्र.१२१३६ नागपूर-पुणे एक्सप्रेस २४ रोजी, गाडी क्र.१२१३५ पुणे-नागपूर एक्सप्रेस २५ रोजी रद्द करण्यात आली आहे.
गाड्यांच्या वेळेत झाला काहीसा बदल
गाडी क्रमांक २२८४५ पुणे-हाटिया एक्सप्रेस १२ जानेवारी रोजी २ तास १० मिनिटांनी आणि १८, २१ जानेवारी रोजी २ तासांनी उशिराने सुटेल.त्यामुळे बडनेरा स्टेशनवर ही एक्सप्रेस तिच्या निर्धारित वेळेत अर्थात रात्री ११.५७ऐवजी रात्री १.५७ वाजता पोहोचेल. सध्या थंडी व धुक्यामुळे रेल्वे गाड्या उशिरा धावत असल्यामुळे या गाडीने प्रवासाच्या दिवशी प्रवाशांनी वेळेची खात्री करूनच स्टेशनवर पोहोचणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे गाडी क्र. ११४०६ अमरावती-पुणे साप्ताहिक एक्सप्रेस २४ जानेवारी रोजी ०२ तास ३० मिनिटांनी उशिरा धावणार आहे. रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी.
प्रवाशांची सुटीच्या कालावधीत गैरसोय
अमरावती जिल्हयातील मोठ्या संख्येत चाकरमाने, विद्यार्थी, प्रवासी अमरावती व बडनेरा स्टेशनवरून अमरावती-पुणे-अमरावती असे जाणे-येणे करीत असतात. सलग दोन ते तीन दिवस सुट्या आल्या की, अनेकजण गृह नगरात येतात. यंदा राष्ट्रीय उत्सव गणराज्य दिन २६ जानेवारी सोमवारी आला आहे. तत्पूर्वी २४ रोजी शनिवार व २५ रोजी रविवारची सुटी आली आहे.या तिन्ही सुट्यांचा लाभघेण्यासाठी अनेकांनी पुणे-अमरावती, बडनेरा तसेच अमरावती, बडनेरा-पुणे असे आरक्षण आधीच करून ठेवले होते. मात्र, नेमक्या याच कालावधीत रेल्वेने मेगा ब्लॉक घेतल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली आहे. त्यांना आता इतर पर्यायी साधनांनी अमरावती, बडनेराला यावे लागेल किंवा प्रवासाचा बेतच रद्द करावा लागणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी