
अमरावती, 12 जानेवारी (हिं.स.)
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अमरावती शहर गुन्हेशाखेच्या वतीने विशेष कोबींग ऑपरेशन राबविण्यात आले. दिनांक १० आणि ११ जानेवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या या मोहिमेत अमली पदार्थ विक्री, अवैध शस्त्र बाळगणे, जबरी चोरी तसेच अवैध दारू निर्मिती व विक्रीप्रकरणी एकूण पाच धडक कारवाया करण्यात आल्या.गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीप्रकरणी १९ वर्षीय तेजस दिवाकर माथुरकर याला ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यात आला. तसेच गुप्त माहितीच्या आधारे गांजाची विक्री करणाऱ्या विरेंद्र विजय किर्तक याच्याकडून १.०८० किलो गांजा, अंदाजे २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.याच परिसरात एका विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली, तर जिल्हाधिकारी कार्यालय चौकात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या वरद उर्फ टक्या आनंद तांबेकर याच्याकडून लोखंडी कोयता जप्त करून आर्म ॲक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली.फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सरदारपुरा, वडाळी येथे अजीत कौर अवतारसिंग टाक हिच्या घराच्या आवारात सुरू असलेली गावठी दारू निर्मिती उघडकीस आली. यावेळी ५० लिटर हातभट्टी दारू, २०० लिटर रसायन व इतर साहित्य असा सुमारे ८२ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला.ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. निवडणूक काळात अशाच कडक कारवाया सुरू राहणार असल्याचा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी