
छत्रपती संभाजीनगर, 12 जानेवारी (हिं.स.)। स्टेअरिंग ही डेअरिंग करण्याची जागा नव्हे. वाहन चालविणे ही जबाबदारी आहे. त्यासाठी रस्ता सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य असून नियम पालन करुन संयमाने वाहन चालविण्यातच खरी हिरोगिरी आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तरुणांना मार्गदर्शन केले.
रस्ता सुरक्षा अभियानाचा प्रारंभ एम.जी.एम. विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात आज करण्यात आला. युवा दिनानिमित्त सिटी युथ आयकॉन या पुरस्काराने विविध क्षेत्रात गौरवपूर्ण कामगिरी केलेल्या युवकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कुलगुरु डॉ. विलास सपकाळ, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, अधीक्षक अभियंता एस.एस. भगत, महामार्ग पोलीस अधीक्षक रुपाली दरेकर, पोलीस उपायुक्त वाहतुक शर्मिष्ठा घारगे वालावलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ॲड. भगवान सदावर्ते- बाल शिक्षण, अर्णव महर्षि- विज्ञान तंत्रज्ञान, स्वाती पाटील- सहा. यांत्रिक अभियंता, दर्शन घोरपडे- आयर्न मॅन, तनिषा बोरामणीकर- बुद्धीबळ खेळाडू, डॉ. कविता जाधव- वैद्यकीय अधिकारी, कृष्णा मोहकरे- मोटार वाहन निरीक्षक, सचिन पाटील, प्रमोद गरड- पोलीस हेड कॉन्स्टेबल, आरती राठोड- सहा. अभियंता, पायल नाईकवड- मुख्य कार्यकारी अधिकारी रेयॉन इल्युमनेशन आणि एनर्जी सोल्युशन्स अशा विविध क्षेत्रातील युवकांना गौरविण्यात आले.
प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे व महामार्ग पोलीस अधीक्षक रुपाली दरेकर यांनी उपस्थित विद्यार्थी युवक युवतींना रस्ता सुरक्षा व नियम पालनाचे महत्त्व सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis