
जळगाव , 12 जानेवारी (हिं.स.)। शहरासह जिल्ह्यातील वातावरणातील बदलामुळे तापमानात चढउतार बघायला मिळत असून कधी तापमान अचानक खाली जात आहे तर कधी वाढ होत आहे. जळगावचे किमान तापमान १०.८ अंशांवर होते. यामुळे रात्री आणि सकाळच्या वेळेतील थंडीचा कडाका कायम आहे. दरम्यान, थंडीची तीव्रता अजून काही अंशी वाढण्याची शक्यता आहे.उत्तरेकडून सलग येणाऱ्या या शीतलहरींमुळे जळगावात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः आज १२ ते १५ जानेवारीदरम्यान ढगाळ वातावरण व थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.या काळात किमान तापमान १० ते १२ अंशांदरम्यान तर कमाल तापमान २९ ते ३१ अंश सेल्सिअस असे राहील.पश्चिमी विक्षोभामुळे हवामानात थोडीशी अस्थिरता देखील आहे, म्हणजे रोज एकसारखेच तापमान राहण्याची शक्यता कमी आहे. दररोजच्या कमाल व किमान तापमानात सरासरी एक ते दीड अंशाची घसरण किंवा वाढ होण्याचा अंदाज आहे. असे असले तरी थंडीचा तडाखा अजून किमान आठवडा ते दहा दिवस कायम राहील. १३ जानेवारीनंतर जिल्ह्यात काहीसे ढगाळ वातावरण राहील. त्यामुळे उष्णतेत घट होऊन थंडीचा जोर वाढेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर