
मुंबई, 12 जानेवारी (हिं.स.)। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रशासनाकडून जास्तीत जास्त मतदानासाठी आवाहन केलं जात असतानाच जुहू परिसरात सुमारे 35 हजार नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. जुहूतील रुईया पार्क आणि कराची सोसायटी परिसरासह जवळपास 200 इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट होत असून परिसरात बहिष्काराच्या आशयाचे बॅनर झळकू लागले आहेत.
नागरिकांचा आरोप आहे की या भागात लष्करी रडार असल्यामुळे इमारतींच्या पुनर्विकासावर विविध निर्बंध लागू झाले आहेत आणि त्याचा थेट फटका गेल्या 35 वर्षांपासून रहिवाशांना बसत आहे. परिणामी सुमारे 200 इमारती आणि दोन मोठ्या झोपडपट्ट्यांमधील नागरिक अतिधोकादायक इमारतींमध्ये राहण्यास हतबल झाले असून त्यांच्या जीवितास सतत धोका जाणवतो.
रहिवाशांनी केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाकडे आपली समस्या वारंवार मांडूनही कोणताही ठोस निर्णय न झाल्याचा आरोप केला आहे. बॅनरवर 1976 मध्ये अंमलात आलेल्या 1939 च्या ब्रिटिश कायद्यामुळे घरांचा पुनर्विकास अडथळ्यात येत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. “SR0150 कायदा कालबाह्य असून त्याच्यामुळे आमची घरे उद्ध्वस्त होत आहेत, मतदान करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा” असा मजकूर बॅनरवर दिसत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्यामुळे आता खोटी आश्वासने मान्य केली जाणार नाहीत, असा इशाराही रहिवाशांनी दिला आहे.
या घडामोडींनंतर प्रभाग क्रमांक 68 मधील मनसेचे उमेदवार संदेश देसाई यांनी संबंधित परिसरातील नागरिकांची भेट घेतली. त्यांनी निवडणुकीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंची भेट घडवून देऊन या प्रश्नाचा पाठपुरावा करण्याचं आणि योग्य तो तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं. मात्र रहिवाशांनी ठोस उपाययोजना न झाल्यास मतदानावर बहिष्कार कायम ठेवण्याची भूमिका स्पष्ट केली असून आगामी निवडणुकीत या बहिष्काराचा मतदान टक्केवारीवर काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule