श्री सिद्धेश्वर महायात्रा 2026 यशस्वी करण्यासाठी समन्वयातून सुविधा द्या – जिल्हाधिकारी
सोलापूर, 12 जानेवारी (हिं.स.) — सोलापूर शहरात होणाऱ्या श्री सिद्धेश्वर महायात्रेनिमित्त दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन, सोलापूर महानगरपालिका आणि श्री सिद्धेश्वर मंदिर समिती यांनी परस्पर समन्वयातून भाविकांना उत्तम सुविधा
Collactor kumar


सोलापूर, 12 जानेवारी (हिं.स.) — सोलापूर शहरात होणाऱ्या श्री सिद्धेश्वर महायात्रेनिमित्त दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन, सोलापूर महानगरपालिका आणि श्री सिद्धेश्वर मंदिर समिती यांनी परस्पर समन्वयातून भाविकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व महायात्रा यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित श्री सिद्धेश्वर महायात्रा 2026 च्या पूर्वतयारी आढावा बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, श्रीमती विना पवार, सोलापूर शहर पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील, महायात्रा इन्सिडेंट कमांडर तथा शहर अभियंता श्रीमती सारिका आकुलवार, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख व पंच कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले की, यात्रा कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. मंदिर परिसर व होम मैदान संपूर्णपणे सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी आवश्यक ठिकाणी कॅमेरे बसवावेत. तसेच संपूर्ण सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी पोलीस बंदोबस्त व वाहतूक नियंत्रण प्रभावीपणे राबवावे, असे निर्देश त्यांनी दिले.

मंदिर परिसर व होम मैदानात उभारण्यात येणाऱ्या विविध स्टॉल्स व मनोरंजन साहित्याची तपासणी करून शासकीय यंत्रणेकडून फिटनेस प्रमाणपत्र घेण्याची कार्यवाही महापालिकेने करावी. प्रत्येक स्टॉलसाठी देण्यात येणाऱ्या वीज जोडणीची तपासणी विद्युत निरीक्षकांकडून करून घ्यावी. अग्निशामन दलाने अग्नी प्रतिबंधक साहित्य उपलब्ध करून द्यावे व स्टॉलधारकांना आवश्यक प्रशिक्षण द्यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने मंदिर परिसर व होम मैदानात आवश्यक ठिकाणी सुसज्ज आरोग्य पथके, वैद्यकीय उपकरणे व औषधे उपलब्ध ठेवावीत. ॲम्बुलन्स व आयसीयू सेंटर तत्पर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नियोजनासाठी पोलीस विभागाशी समन्वय साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय इन्सिडेंट कमांडर यांनी त्यांच्या अंतर्गत नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्कासाठी टू-जी सेवा देणारे फीचर फोन उपलब्ध करून घ्यावेत. तसेच मंदिर परिसर, होम मैदान व प्रदक्षिणा मार्गावर उप-इन्सिडेंट कमांडर म्हणून मुख्य अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी महापालिका प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

-----------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande