खुलताबादमध्ये उपनगराध्यक्षासाठी मंगळवारी मतदान; भाजप- राष्ट्रवादीत रस्सीखेच
छत्रपती संभाजीनगर, 12 जानेवारी (हिं.स.)। खुलताबाद नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी मंगळवारी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात उपनगराध्यक्
खुलताबादमध्ये उपनगराध्यक्षासाठी मंगळवारी मतदान; भाजप- राष्ट्रवादीत रस्सीखेच


छत्रपती संभाजीनगर, 12 जानेवारी (हिं.स.)। खुलताबाद नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी मंगळवारी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात उपनगराध्यक्ष पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असून, या निवडणुकीत काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट पुढे आले आहे.

भाजपकडून आमदार प्रशांत बंब, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून जिल्हाध्यक्ष तथा पदवीधर आमदार सतीश चव्हाण हे आपल्या-आपल्या पक्षाचा उमेदवार उपनगराध्यक्ष बनवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. दोन्ही प्रमुख नेत्यांनी स्वतंत्रपणे हालचाली वाढवल्या असून, कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.

मंगळवारी उपनगराध्यक्ष पदासाठी हात उंचावून मतदान होणार आहे. पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष आमेर पटेल यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. ज्या उमेदवाराला अधिक नगरसेवकांचा पाठिंबा मिळेल, तो उपनगराध्यक्ष म्हणून निवडून येणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे नगराध्यक्ष आमेर पटेल आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

२० सदस्यांच्या नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष पदासाठी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांना काँग्रेसच्या पाठिंब्याची गरज आहे. राष्ट्रवादीकडे ९ सदस्य, भाजपकडे ७ सदस्य असल्याने काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय कोणत्याही पक्षाला उपनगराध्यक्ष पद मिळवणे अशक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही पक्ष एकमेकांना पाठिंबा देतील, अशी शक्यता अत्यंत कमी असल्याने काँग्रेस हाच 'किंगमेकर' ठरणार असल्याचे बोलले जातेय.

नगरपरिषदेतील संख्याबळाचे गणित असे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : ९ नगरसेवक, भारतीय जनता पक्ष : ७ नगरसेवक, काँग्रेस उर्वरित नगरसेवक. काँग्रेसने नगराध्यक्षपद जिंकून राजकीयदृष्ट्या महत्त्वाची कामगिरी केली असली, तरी उपनगराध्यक्ष पद मिळवण्यासाठी आवश्यक ते संख्याबळ काँग्रेसकडे स्वतंत्रपणे नाही. त्यामुळे यावेळी काँग्रेसची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

----------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande