
पुणे, 12 जानेवारी (हिं.स.)। मागील वर्षीच्या शेवटच्या काही महिन्यांत अतिवृष्टीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. गावरान कांद्यासह खरीप कांद्याला मोठा फटका बसला, त्यामध्ये निर्यात बंदी, कीड रोग, खते, बियाणे आणि मशागत खर्चात झालेली वाढीमुळे अगोदरच गोत्यात आलेला शेतकरी कांद्याच्या कमी दरामुळे नाडला जात आहे. बाजारातील दरात सातत्याने पडझड होत असल्याने आंबेगाव तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.सध्या बाजारात गावरान कांद्याला सरासरी ९०० रुपये तर लाल कांद्याला १००० रुपये प्रति क्विंटल सरासरी दर मिळत आहे, असे सांगितले जात आहे. परंतु, बहुतांश ठिकाणी कांद्याचा दर ६०० रुपयांच्या आतच आहे. कांदा दराला निर्यात बंदीचा फटका बसत असून सध्याच्या दरातून मिळणाऱ्या रकमेत खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल आहेत.प्रामुख्याने पुणे जिल्ह्यात कांद्याचे अधिक प्रमाणात उत्पादन घेतले जाते. खरीप लेट खरिपात साधारण 5 हजार हेक्टर क्षेत्रात रब्बीत साधारणतः ७ ते ८ हजार हेक्टरकांद्याचे क्षेत्र असते. दरवर्षी कांदा क्षेत्रात बदल होतो. दराची पडझड मात्र गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. एखाद्या लिलावाला दर वाढले की लगेच पुढच्या लिलावाला दर कमी होत आहेत. मागील आठवड्यात गावरान कांद्याचे दर 3 हजार रुपयांपर्यंत तर लाल कांद्याचे दर ३ हजार ६०० रुपयांपर्यंत गेले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा दर खाली आले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक मात्र कमालीचे हतबल झाले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु