
रत्नागिरी, 12 जानेवारी, (हिं. स.) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या समान किमान कार्यक्रमाअंतर्गत येथील देव घैसास कीर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आज जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे विधी साक्षरता कार्यक्रम पार पडला.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद यशवंतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा व वाहतूक चिन्हे, गुड समरिटन, आदिवासी समुदायांचे हक्क, विविध सरकारी कल्याणकारी योजना तसेच नालसा योजनेअंतर्गत मोफत कायदेशीर मदत सेवा या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर समाजात वाढत असलेल्या 'ड्रग अॕब्यूज' (अमली पदार्थाचे व्यसन) या गंभीर समस्येवरही मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव आर. आर. पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील होत्या.
कार्यक्रमादरम्यान सचिव आर. आर. पाटील यांनी विधी सेवा प्राधिकरणामार्फत मिळणाऱ्या मोफत कायदेशीर मदतीचे महत्त्व, नागरिकांचे मूलभूत हक्क व कर्तव्ये तसेच विविध शासकीय योजनांची माहिती, रस्ते सुरक्षा व गुड समरिटनविषयाची माहिती सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी