जनतेसाठी काम करण्याची तळमळ असलेल्या उमेदवारांनाच संधी देण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, 12 जानेवारी (हिं.स.)। महानगरपालिकेची निवडणूक केवळ नगरसेवक निवड प्रक्रिया नाही, तर शहराच्या उद्याचा, मुलांच्या सुरक्षित भवितव्याचा निर्णय आहे. शहराचा पाणीप्रश्न राज्यभरात थट्टेचा विषय झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत जात, धर्म, पै
जनतेसाठी काम करण्याची तळमळ असलेल्या उमेदवारांनाच संधी देण्याचे आवाहन


छत्रपती संभाजीनगर, 12 जानेवारी (हिं.स.)। महानगरपालिकेची निवडणूक केवळ नगरसेवक निवड प्रक्रिया नाही, तर शहराच्या उद्याचा, मुलांच्या सुरक्षित भवितव्याचा निर्णय आहे. शहराचा पाणीप्रश्न राज्यभरात थट्टेचा विषय झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत जात, धर्म, पैसा, भावनिक घोषणांच्या पलीकडे जाऊन विचार करा आणि स्वच्छ उमेदवार निवडा,' असे आवाहन शहरातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक चळवळीतील मान्यवरांनी केले आहे.

महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे. पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभाझाल्या आहेत. मतदानाला दोन दिवस शिल्लक असून शहरातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, अभ्यासकांनी जनतेला स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार निवडण्याचे आवाहन केले आहे. 'गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी घसरली आहे.

आयाराम-गयारामाची संस्कृती, जात-धर्माचे विष, पैशाच्या जोरावर विकली जाणारी मते या कोलाहलात सामान्यांचे प्रश्न कुणालाच ऐकू येत नाहीत. पाणी, रस्ते, कचरा, स्वच्छता, शाळा, रुग्णालये, खेळाची मैदाने हे मूलभूत हक्क राजकीय स्वार्थासाठी गहाण ठेवले गेले आहेत.

छत्रपती संभाजीनगरचा पाण्याचा प्रश्न राज्यभरात थट्टेचा विषय बनला आहे. एवढ्या मोठ्या शहरात लोकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, यावर इतरांचा विश्वास बसत नाही. पण ज्यांच्यावर जबाबदारी आहे, तेच आज तुमच्या दारात उभे राहून मते मागत आहेत, हे विसरू नका. आपण मेहनतीने कमावलेले पैसे कराच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीत जमा करतो.

पण बदल्यात काय मिळते ?

खड्ड्यांचे रस्ते, साचलेला कचरा, अपुऱ्या आरोग्य सुविधा, दुर्लक्षित शाळा आणि असुरक्षित परिसर. हा अन्याय किती दिवस सहन करणार या सगळ्याला जबाबदार कोण ? लोकप्रतिनिधी आणि नोकरशाही यांचे साटेलोटे आहे. लोकप्रतिनिधी स्वच्छ चारित्र्याचे असते तर प्रशासनावर दबाव असता. पण इथे तर दोघे मिळून सामान्य नागरिकांची उघड लूट करीत आहेत. ही वेळ तक्रार करण्याची नसून हस्तक्षेप करण्याची आहे. नवीन चेहरा, स्वच्छ चारित्र्य, प्रामाणिकपणा आणि जनतेसाठी काम करण्याची तळमळ असलेल्या उमेदवारांनाच संधी देऊ या', असे मान्यवरांनी प्रसिद्धीपत्रक जाहिर करून आपले मत मांडले आहे.

या पत्रकावर साथी सुभाष लोमटे, माजी न्या. डी. आर. शेळके, अॅड. विष्णू ढोबळे, प्रा. जयदेव डोळे, डॉ. दासू वैद्य, कॉ. भीमराव बनसोड, धनंजय लांबे आदी मान्यवरांची नावे आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande