
रायगड, 12 जानेवारी (हिं.स.)। मकरसंक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे. पौष महिन्यात साजऱ्या होणाऱ्या या सणासाठी लागणाऱ्या साहित्याने बाजारपेठा सजल्या असून मडकी, तिळगुळ, पतंग, ऊस, फुले तसेच पूजेच्या वस्तूंची विक्री तेजीत आहे.
सुगडी पूजन, भोगी सण आणि संक्रांतीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी नागरिकांकडून केली जात आहे. तिळगुळ, तिळाच्या वड्या, तिळाचा हलवा, गूळ तसेच बाजरीचे पीठ यांना विशेष मागणी आहे. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांसाठी पूजेचे साहित्य, वाण आणि हलव्याचे दागिने महिलावर्गाकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जात आहेत. सुवासिनी हंगामातील भाज्या व धान्य सुगडीत ठेवून पूजन करीत आहेत.
यंदा महिलांमध्ये पर्यावरणपूरक वाण देण्याचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. प्लास्टिक साहित्याला फाटा देत कापडी पिशव्या, तेल लावण्याचे ब्रश, तेलाच्या बाटल्या यांसारख्या उपयुक्त वस्तूंना प्राधान्य दिले जात आहे. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकवाचे कार्यक्रम होणार असल्याने या वस्तूंना बाजारात चांगली मागणी असल्याची माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली.
भोगीच्या पार्श्वभूमीवर वाल पापडी, पापडी, मटार, वांगी, पावटा, गाजर आदी भाज्यांची खरेदी वाढली असून मागणी वाढल्याने काही भाज्यांच्या किरकोळ दरात वाढ झाली आहे. मकरसंक्रांतीदरम्यान तिळगुळ व तिळाच्या पदार्थांना विशेष धार्मिक व आरोग्यदृष्ट्या महत्त्व आहे. थंडीच्या दिवसांत तीळ उष्ण असल्याने त्यांचा वापर केला जातो. संक्रांतीनंतर युवकांमध्ये रंगीबेरंगी पतंग उडवण्याचा उत्साह दिसून येत असून सायंकाळच्या वेळी आकाशात उडणारे पतंग सणाच्या वातावरणात रंग भरत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके