
रत्नागिरी, 12 जानेवारी, (हिं. स.) : संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर येथील स्वयंभू श्री देव मार्लेश्वराच्या वार्षिक यात्रोत्सवाला आंगवली येथील मार्लेश्वर देवालयात दिमाखात प्रारंभ झाला आहे. यंदाचा यात्रोत्सव १७ जानेवारीपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार असून दि. १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांतीच्या दिवशी कल्याणविधी होणार आहे.
देवरूख शहरापासून अवघ्या १८ किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत, उंच कडे व दाट हिरव्या वनराईने वेढलेल्या निसर्गरम्य परिसरात एका गुहेमध्ये स्वयंभू श्री देव मार्लेश्वर देवस्थान वसले आहे. हे देवस्थान सुमारे अठराव्या शतकातील असून मार्लेश्वराच्या इतिहासाला आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. देवस्थानाचे मूळ शिवलिंग देवरूखपासून तीन किलोमीटर अंतरावरील मुरादपूर गावात होते. मात्र तेथील अत्याचार व अस्वस्थतेमुळे, जेथे मनुष्यवस्ती नाही आणि भ्रष्टाचार नाही अशा शांत ठिकाणी जाण्याचा निर्धार करून शिवलिंगरूपी सत्पुरुषाने आंगवली मठात स्थलांतर केल्याची आख्यायिका आहे. पुढे सह्याद्रीच्या कपारीतील गुहेत मार्लेश्वर देव राहिल्याचे मानले जाते. त्यामुळे आंगवली मठाला आजही अनन्यसाधारण महत्त्व असून, यात्रोत्सवाची सुरुवात परंपरेनुसार याच ठिकाणाहून होते.
यात्रोत्सवात दि. १३ जानेवारी रोजी सकाळपासून विविध मानाच्या पालख्यांचे व दिंड्यांचे मार्लेश्वर देवालयात आगमन होऊन शिखराकडे प्रस्थान होईल. सायंकाळी ४ ते ७ खेळ पैठणीचा अंतिम फेरी, तर ७ ते रात्री १० वाजेपर्यंत विवाहसोहळ्यास जाण्यापूर्वीचे धार्मिक विधी पार पडणार आहेत. रात्री ८ ते १० वाजता महाप्रसाद, भोईराज जेवण व मान्यवरांचे स्वागत-सत्कार, तर रात्री ११.३० वाजता मार्लेश्वर पालखीचे विवाहसोहळ्यासाठी शिखराकडे प्रस्थान होईल.
दि. १४ जानेवारी रोजी मार्लेश्वर तीर्थक्षेत्री श्री देव मार्लेश्वर व साखरप्याची गिरीजादेवी यांचा भव्य विवाहसोहळा, दि. १५ जानेवारी रोजी मारळ येथे मार्लेश्वराची वार्षिक यात्रा, दि. १६ जानेवारी रोजी आंगवली गावात मार्लेश्वर पालखीचे घरोघरी दर्शन, तर दि. १७ जानेवारी रोजी घरभरणीने यात्रोत्सवाची उत्साहात सांगता होणार आहे.
या वार्षिक यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असून, देवरूख एसटी आगारातून अतिरिक्त एसटी बसेसची सोय करण्यात आली आहे. तसेच मार्लेश्वर तीर्थक्षेत्री देवरूख पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, प्रशासनाने भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी