खर्चाशिवाय चर्चा नाही, प्रमुख उमेदवारांकडून चहा-पाणी, नाष्ट्यासह जेवणावळी व पार्ट्याचे सत्र सुरुच
परभणी, 12 जानेवारी (हिं.स.)। महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत प्रमुख पक्षांच्या प्रबळ उमेदवारांना या प्रचारयुध्दात कट्टर समर्थकांसह अन्य कार्यकर्ते व सर्वसामान्य मतदारांचे सर्वार्थाने लाड पुरवितांना अक्षरशः नाकीनऊ येवू लागले आहे.
खर्चाशिवाय चर्चा नाही, प्रमुख उमेदवारांकडून चहा-पाणी, नाष्ट्यासह जेवणावळी व पार्ट्याचे सत्र सुरुच


परभणी, 12 जानेवारी (हिं.स.)।

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत प्रमुख पक्षांच्या प्रबळ उमेदवारांना या प्रचारयुध्दात कट्टर समर्थकांसह अन्य कार्यकर्ते व सर्वसामान्य मतदारांचे सर्वार्थाने लाड पुरवितांना अक्षरशः नाकीनऊ येवू लागले आहे.

प्रत्येक प्रभागातील लढतीचं चित्र स्पष्ट झाल्याबरोबर प्रमुख पक्षांच्या प्रबळ उमेदवारांनी आपआपल्या कार्यक्षेत्रात अल्पावधीतच मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती व्हावी या दृष्टीने कुटूंबातील प्रत्येक सदस्यासह नातेगोते व मित्र परिवारास प्रचारयुध्दात जुंपले आहे. कट्टर समर्थक व अन्य कार्यकर्त्यांवर महत्वपूर्ण जबाबदार्‍या सुपूर्त करतेवेळी भल्या मोठ्या प्रभागक्षेत्रात डोअर टू डोअर संपर्क साधण्याकरीता तीन आघाड्यांमार्फत जीवाचं रान करतेवेळी स्वतःच्या संस्था, प्रतिष्ठानांतर्गत कर्मचार्‍यांनाही व्यवस्थापनासह बाहेरगावचे मतदार मतदान केंद्रापर्यंत आणण्यापर्यंत जबाबदार्‍या सुपूर्त केल्या आहेत. परंतु, या सार्‍या प्रचारयंत्रणेत सर्वार्थाने सर्व आघाड्या कार्यान्वित करतेवेळी या प्रमुख उमेदवारांना मनुष्यबळाबरोबर आर्थिकदृष्ट्याही मोठ्या कसरती कराव्या लागत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी केलेल्या शक्तीप्रदर्शनासह प्रचार कार्यालय कार्यान्वित करण्यापासून प्रचाराचे नानाविधी साहित्य, छोटे-मोठे होर्डीग्ज, झेंडे, बॅनर, पताका व अन्य साहित्य तसेच कार्यपुस्तिकांसह संकल्पनामे व अन्य छपाईकरीता या उमेदवारांना मोठा खर्च आला आहे. ऑटोरिक्षा, छोटाहत्तीद्वारे प्रचाराचे रथ, सोशल मिडीयातून नानाविधी व्हिडीओ क्लिप, प्रभागाच्या प्रत्येक गल्लीबोळांमधून पदयात्रा, मोटारसायकल रॅली तसेच डिजिटल रथ वगैरेंवर सुध्दा खर्च करावा लागतो आहे.

सकाळपासूनच चहापाणी, नाष्टा, दोन वेळचे जेवण याकरीताही प्रमुख उमेदवारांनी आपआपल्या कार्यक्षेत्रात भट्ट्याच पेटविल्या आहेत. भले मोठे मंडप टाकून या जेवणावळीतून दररोज ठिकठिकाणी हजारो कार्यकर्ते, सामान्य मतदारांच्या पंगती उठत आहेत. काही प्रभागात काही कट्टर कार्यकर्ते दररोज या प्रबळ उमेदवारांद्वारे पार्ट्यासुध्दा झोडू लागले आहेत. परभणी शहरासह चोहोबाजूंच्या रस्त्यावरील धाबे आणि हॉटेल्स हे कार्यकर्त्यांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहेत.

काही प्रमुख उमेदवारांनी प्रचारयुध्द सुरु होण्यापूर्वीपासूनच आपआपल्या प्रभागात वेगवेगळ्या मार्गांद्वारे खर्च सुरु केला. त्याचे गणित अद्यापपर्यंत लागले नाही. आता प्रचारयुध्दातसुध्दा पाण्यासारखा खर्च होत आहे. भडकलेल्या महागाईमुळे प्रत्येक गोष्टीत आर्थिक तडाखा बसतो आहे. परंतु, स्वतःच्या राजकीय अस्तित्वासह प्रतिष्ठेकरीता रंगलेल्या या लढाईतून आता माघार नाही, हे गृहीत धरुच या प्रमुख उमेदवारांनी डोळ्यासमोर ठेवलेल्या बजेटपेक्षा अधिक खर्च सोसण्याचा नाईलाजास्तव निर्णय घेतला आहे.

या निवडणूकीतील प्रचारयुध्दाने कळस गाठला आहे. आता तीन दिवस बाकी आहेत. रात्र थोडी सोंगे फार असेच चित्र आहे, रंगलेल्या या लढाईत शेवटच्या टप्प्यात लक्ष्मीअस्त्राचे हत्यार उपसले जाईल, हे स्पष्ट आहे. त्यामुळेच प्रभागातील या मतागणिक खर्च या उमेदवारांना सोसावा लागणार हे निश्‍चित आहे. त्यामुळे उमेदवारांचे कागदोपत्री खर्च आणि प्रत्यक्ष खर्च याचे आकडे हे डोळे दिपवणारेच ठरणार आहेत. खर्च केल्याशिवाय चर्चा नाही, हे एकमेव सूत्र अवलंबून हे उमेदवार या निवडणूकीतून एक प्रकारचा जूगारच खेळत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande