
पुणे, 12 जानेवारी (हिं.स.)।शहर भयमुक्त करून सर्वसामान्यांच्या विकासाचा ‘धनुष्यबाण’ महापालिकेत नेण्याचा निर्धार शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित विविध जाहीर सभांमध्ये बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी घराणेशाही आणि भ्रष्ट मांडवलीच्या राजकारणावर जोरदार प्रहार केला. कोणत्याही दबावाला बळी न पडता शिवसेना उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
येरवडा-गांधीनगर प्रभाग क्रमांक सहामधील सभेत त्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. शहरातील कचरा प्रकल्पासंदर्भातील चर्चेदरम्यान सभागृहात अनुपस्थित राहून ठेकेदारांशी मांडवली करणाऱ्या माजी नगरसेवकांचा त्यांनी समाचार घेतला. लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखालील व्यक्तीस स्वीकृत नगरसेवक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.फुलेनगर-नागपूर चाळ आणि विमाननगर-लोहगाव येथील सभांमध्ये डॉ. गोऱ्हे यांनी शिवसेनेचा विकासनामा मांडला. येत्या काळात दोन लाख महिलांना ‘लखपती’ बनवण्यासाठी सहकारी तत्त्वावर उद्योगभवन उभारणे, नोंदणीकृत बचत गटांना दरवर्षी ५० हजारांची मदत आणि पीएमपी बससेवेत महिलांना ५० टक्के सवलत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु