
नाशिक, 12 जानेवारी (हिं.स.) -
- राज्यात गुंतवणुकीसाठी आता नाशिक हाच खंबीर पर्याय असून उत्तर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
नाशिक दौऱ्यावर आले असता व्यापारी व उद्योजकांच्या संवाद मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून जयकुमार रावल बोलत होते. व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष आशिष नहार,आ.सीमाताई हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार,धान्य किराणा व्यापारी असोसिएशनचे प्रफुल्ल संचेती, निमाचे माजी अध्यक्ष विवेक गोगटे, अजित सुराणा, सतीश कोठारी आदी होते.
आपल्या भाषणात जयकुमार रावल यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भारत विरोधी धोरणाचा तीव्र शब्दात निषेध केला. ट्रम्प यांनी भारताला टार्गेट केले असून ते भारतावरील कर पन्नास वरून पाचशे टक्के करण्याच्या विचारात ते आहेत. ट्रम्प यांच्या या धोरणामुळे भारतातील वस्त्रोद्योग उद्योगाला खूप अडचणी निर्माण झाल्या आहेत. भारताला मोदींसारखे पंतप्रधान लाभले व त्यांच्यामुळेच आपण या परिस्थितीत सुद्धा खंबीरपणे तग धरून आहोत. ट्रम्प यांच्या धोरणाला तोंड देण्यासाठी आपणास स्वावलंबी भारत बनवावा लागेल असेही रावल यांनी पुढे सांगितले.
उद्योगपतींची ताकद मोठी असून त्यांना खंबीर संरक्षण देण्याचे काम साशनाच्या माध्यमातून होत आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्या चांगल्या स्थानावर नाहीत याबाबत पणनमंत्री रावल यांनी तीव्र शब्दात खंत व्यक्त केली. नाशिक बाजार समितीतर्फे एक टक्का जाचक कर व्यापारी व शेतकऱ्यांवर लादला जातो ही बाब गंभीर असल्याचे प्रफुल्ल संचेती व सुनील केदार यांनी निदर्शनास आणून दिली असता निवडणुका संपल्यानंतर याबाबत कठोर निर्णय घेण्याचे संकेत रावल यांनी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV