
पुणे, 12 जानेवारी (हिं.स.)। पुणे महापालिका प्रशासनाने मतमोजणीसाठीची जय्यत तयारी केली असून तब्बल 30 हजार कर्मचारी ही प्रक्रिया पार पाडणार आहेत. शहरात 15 ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होऊन दुपारी तीनपर्यंत सर्व ठिकाणच्या निकालाचे चित्र स्पष्ट होईल. मतमोजणीच्या एका फेरीसाठी साधारणतः 35 ते 45 मिनिटांचा कालावधी लागणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.
महापालिकेच्या 41 प्रभागात नगरसेवकांच्या 165 जागा आहेत. त्यासाठी 1 हजार 555 उमेदवार रिंगणात असून 15 जानेवारीला (गुरूवारी) मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. 41 प्रभागांमध्ये 4 सदस्यीय 40 प्रभाग आहेत. तर प्रभाग क्रमांक 38 हा पाच सदस्यीय आहे.
मतमोजणीसाठी 15 मतमोजणी केंद्रावर 335 मतमोजणी टेबल असणार आहे. यातील 38 टेबल टपाली मतदाना करता तर मतदान यंत्र मोजण्यासाठी 297 टेबल असणार आहेत. एका प्रभागासाठी मतमोजणीच्या किमान 4 तर जास्तीत जास्त 12 फेऱ्या होतील. एका फेरीसाठी साधारण 35 ते 45 मिनीटे लागतील. त्यामुळे महापालिकेचा निकाल दुपारी तीनपर्यंत स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु