
छत्रपती संभाजीनगर, 12 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक- 2025-26 करिता मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/ अधिकारी/ कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या परिपत्रकात नमूद केले आहे.
ही सुट्टी उद्योग, उर्जा व कामगार विभागातंर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागु राहील. (उदा.खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी, हॉटेल, खाद्यगृहे,अन्यगृहे,नाटयगृहे,व्यापार,औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.) अपवादात्मक परिस्थितीत कामगार,अनुपस्थितीमुळे मोठया प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादींना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत मिळेल देण्याबाबत संबंधित आस्थापना मालकांनी दक्षता घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मालकांनी/व्यवस्थापनांनी या सुचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडुन मतदानाकरिता सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरुध्द कारवाई करण्यात येईल,अशी तरतुद आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी गुरुवार दि. 15 रोजी मतदान होणार आहे. या क्षेत्रातील आस्थापनांनी आपल्याकडील कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी सुट्टी देण्यात यावी, असे आवाहन कामगार उप आयुक्त नितीन पाटणकर यांनी केले आहे. याबाबत उद्भवणाऱ्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील कामगार उपआयुक्त यांच्या कार्यालयामध्ये “दक्षता कक्ष स्थापन करण्यात आलेला असून संबधित कामगार, कामगार संघटनांनी दूरध्वनी क्रमांक 0240-2334603 यावर संपर्क साधावा,असे आवाहनही करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis