जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी ड्रोनच्या घिरट्यांनी सैन्यदल सतर्क
जम्मू, १२ जानेवारी (हिं.स.)जम्मू आणि काश्मीरमधील सांबा, राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवरील अनेक अग्रभागी भागात सुरक्षा दलांना संशयास्पद ड्रोन हालचाली आढळल्या. हे सर्व ड्रोन पाकिस्तानातून आले होते आणि काही मिनिटे
जम्मू आणि काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी ड्रोन घिरट्या घालताना दिसले


जम्मू, १२ जानेवारी (हिं.स.)जम्मू आणि काश्मीरमधील सांबा, राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवरील अनेक अग्रभागी भागात सुरक्षा दलांना संशयास्पद ड्रोन हालचाली आढळल्या. हे सर्व ड्रोन पाकिस्तानातून आले होते आणि काही मिनिटे भारतीय हद्दीत घिरट्या घालून परतले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सुरक्षा दलांनी पुढच्या भागात संशयास्पद ड्रोन हालचालींना प्रत्युत्तर म्हणून जमिनीवर शोध मोहीम सुरू केली आहे.

अधिकाऱ्यांनी आज सकाळी सांगितले की, राजौरीमधील नियंत्रण रेषेजवळील नौशेरा सेक्टरमध्ये लष्कराच्या जवानांनी संध्याकाळी ६:३५ वाजता गनिया-कलसियान गावावर ड्रोन हालचाली पाहिल्यानंतर मध्यम आणि हलक्या मशीन गनने गोळीबार केला.

राजौरी जिल्ह्यातील तेरियाथच्या खब्बर गावात संध्याकाळी ६:३५ वाजता आणखी एक ड्रोन दिसला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, चमकणारा प्रकाश असलेला ड्रोन कालाकोटमधील धर्मशाल गावाच्या दिशेने आला आणि भरखच्या दिशेने गेला.

त्यांनी सांगितले की, संध्याकाळी ७:१५ वाजता सांबा येथील रामगड सेक्टरमधील चक बाबरल गावावर एक ड्रोनसारखी वस्तू काही मिनिटे लखलखीत प्रकाशासह फिरताना दिसली. संध्याकाळी ६:२५ वाजता पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील मानकोट सेक्टरमध्ये तैनच्या दिशेने टोपाकडे जाताना आणखी एक ड्रोनसारखी वस्तू दिसली.

त्यापूर्वी शुक्रवारी रात्री, सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील घागवाल येथील पालोरा गावात सुरक्षा दलांना पाकिस्तानकडून ड्रोनने टाकलेल्या शस्त्रांचा एक साठा जप्त करण्यात आला. जप्तीमध्ये दोन पिस्तूल, तीन मॅगझिन, १६ राउंड आणि एक ग्रेनेड समाविष्ट होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande