
गांधीनगर, 12 जानेवारी (हिं.स.)।गुजरातमधील गांधीनगर येथे आज, सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि जर्मनी हे निकटचे सहकारी देश आहेत. त्यामुळेच आज भारतात २,००० हून अधिक जर्मन कंपन्या कार्यरत आहेत. हे भारतावरील जर्मनीच्या अढळ विश्वासाचे प्रतीक आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज उच्च शिक्षणासंदर्भात तयार करण्यात आलेला रोडमॅप शिक्षण क्षेत्रातील आमच्या भागीदारीला नवी दिशा देईल. भारतात जर्मनीतील विद्यापीठांना येण्याचे आम्ही आमंत्रण देत आहोत. भारत आणि जर्मनीदरम्यान आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांची देवाणघेवाण सुरू आहे.दोन्ही देशांमध्ये ऐतिहासिक संबंध आहेत. याशिवाय गाझा आणि युक्रेन संकटावरही आम्ही चर्चा केली आहे.”
भारत आणि जर्मनीच्या संयुक्त विकासाबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आम्ही अनेक क्षेत्रांमध्ये एकत्र येऊन नवे प्रकल्प पुढे नेत आहोत. भारत आणि जर्मनीमधील तांत्रिक सहकार्य दरवर्षी अधिक मजबूत होत आहे. २,००० हून अधिक जर्मन कंपन्या दीर्घकाळापासून भारतात कार्यरत आहेत. भारत आणि जर्मनीच्या संबंधांमध्ये विश्वास आहे तसेच दोन्ही देशांमध्ये गुंतवणुकीचे दृढ नाते आहे.”
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत जर्मनीसोबतची मैत्री अधिक दृढ करण्यासाठी पूर्णतः कटिबद्ध आहे. चान्सलर मर्ज यांचा भारत दौरा अतिशय महत्त्वाच्या काळात होत आहे. “मागील वर्षी आम्ही आमच्या धोरणात्मक भागीदारीचे २५ वर्षे पूर्ण केली आणि यावर्षी आम्ही आमच्या राजनैतिक संबंधांचे ७५ वर्षे साजरे करत आहोत. भारत आणि जर्मनी प्रत्येक क्षेत्रात एकत्र काम करत आहेत. आज झालेल्या करारांमुळे दोन्ही देशांतील संबंध आणखी मजबूत होतील,” असे त्यांनी सांगितले.
संरक्षण व्यापाराशी संबंधित प्रक्रिया सुलभ करण्यासाठी मी चान्सलर मर्ज यांचे आभार मानतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील वाढते सहकार्य हे आमच्या परस्पर विश्वासाचे आणि समान विचारांचे प्रतीक आहे. वाढते व्यापार आणि गुंतवणूक संबंध आमच्या धोरणात्मक भागीदारीला नवी ऊर्जा देत आहेत. भारत नेहमीच सर्व समस्या आणि वाद यांचे शांततापूर्ण मार्गाने निराकरण करण्याचा समर्थक राहिला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode