परभणी मनपा निवडणुकीत प्रतिष्ठा नात्या-गोत्यासाठीच
परभणी, 12 जानेवारी (हिं.स.)। परभणी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत स्थानिक पातळीवरील मातब्बर नेतेमंडळींसह पालिकेंतर्गत आजी-माजी पदाधिकारी, सदस्य हे आपआपल्या प्रभागातील गटा गटात उभे केलेल्या सदस्यांसह नात्यागोत्यांच्या यशस्वीतेकरी
परभणी मनपा निवडणुकीत प्रतिष्ठा नात्या-गोत्यासाठीच


परभणी, 12 जानेवारी (हिं.स.)।

परभणी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत स्थानिक पातळीवरील मातब्बर नेतेमंडळींसह पालिकेंतर्गत आजी-माजी पदाधिकारी, सदस्य हे आपआपल्या प्रभागातील गटा गटात उभे केलेल्या सदस्यांसह नात्यागोत्यांच्या यशस्वीतेकरीता प्रतिष्ठा पणास लावून बसले आहेत.

या महानगरपालिकेंतर्गत 16 प्रभागात 65 जागांकरीता अत्यंत अटीतटीच्या, चुरशीच्या अन् प्रतिष्ठेच्या लढती होत आहेत. त्याचे कारण या लढतीत स्थानिक पातळीवरील मातब्बर नेतेमंडळींसह पालिकेंतर्गत आजी-माजी पदाधिकार्‍यांच्या कुटूंबातील सदस्यांसह गणगोतातील सदस्यच प्रामुख्याने रिंगणात आहेत. त्यामुळेच निवडणूक रिंगणातील उमेदवार कार्यकर्ते राहीले दूर कुटूंबातील व गणगोतातील सदस्यांच्या यशस्वीतेकरीताच या मातब्बरांनी जीवाचा मोठा आटापिटा सुरु केला आहे.

या निवडणूकीच्या रिंगणात या जिल्ह्यातील ज्येष्ठ मातब्बर नेते तथा माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या सौभाग्यवती तथा माजी महापौर सौ. मीनाताई वरपुडकर या प्रभाग क्रमांक 5 मधून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्याकरीता त्यांचे पती सुरेश वरपुडकर, त्यांचे सुपूत्र समशेर वरपुडकर, सून प्रेरणा वरपुडकर यांच्यासह अख्खं कुटूंब प्रचारात गुंतले आहे. याच प्रभागात हभप शंकर आजेगांवकर यांच्या सौभाग्यवती सौ. गिरीजा आजेगांवकर, तसेच ज्येष्ठ नगरसेवक सचिन देशमुख यांच्या सौभाग्यवती सौ. तिलोत्तमा सचिन देशमुख या याच प्रभागातून, या व्यतिरिक्त भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर यांच्या सौभाग्यवती सौ. अश्‍विनी वाकोडकर या प्रभाग क्रमांक 15 मधून, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा पालिकेचे ज्येष्ठ सदस्य अतूल सरोदे हे त्यांच्या सौभाग्यवती प्रतिभा सरोदे या प्रभाग क्रमांक 4 मधून, माजी नगरसेवक प्रशास ठाकूर यांच्या सौभाग्यवती सौ. हर्षाली ठाकूर या प्रभाग क्रमांक 4 मधून, माजी नगरसेवक रामा कानडे यांच्या सौभाग्यवती रेखा कानडे या प्रभाग क्रमांक 12 मधून, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपनगराध्यक्ष अनिल मुदगलकर यांच्या सौभाग्यवती तथा माजी नगरसेविका सौ. मंगल मुदगलकर या प्रभाग क्रमांक 15 मधून, भारतीय जनता पार्टीत नव्याने पदार्पण केलेले व्यवसायिक अभिजित मुंडे यांच्या सौभाग्यवती विजया मुंडे या प्रभाग क्रमांक 10 मधून, ज्येष्ठ नगरसेवक जाकेर लाला यांच्या पत्नी चाँद सुभाना जाकेर खान या प्रभाग क्रमांक 2 मधून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. तसेच प्रभाग क्रमांक 16 मधून आंबेडकरी चळवळीतील नेते सुधीर साळवे यांच्या सौभाग्यवती ओय दिशा भराडे-साळवे या भवितव्य आजमावीत आहेत. त्यामुळे त्यांचे पती हे या निवडणूकीत सौभाग्यवतींच्या यशस्वीतेकरीता मोठा आटापिटा करीत आहेत.

या निवडणूकीत ज्येष्ठ नगरसेवक बालासाहेब बुलबुले यांच्या मातोश्री बायनाबाई बुलबुले या प्रभाग क्रमांक 10 मधून तर भारतीय जनता पार्टीचे उदयोन्मुख नेतृत्व नागसेन पुंडगे यांच्या मातोश्री जयश्री शाम पुंडगे या प्रभाग क्रमांक 16 मधून निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे त्यांचे सुपुत्र हे मातोश्रींच्या यशस्वी लढाईकरीता जीवाचे रान करीत आहेत

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुरेश देशमुख यांचे सुपुत्र गणेश देशमुख हे प्रभाग क्रमांक 1 मधून पुन्हा भवितव्य आजमावित आहेत. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर यांचे सुपुत्र ऐश्‍वर्य वरपुडकर हे या निवडणूकीत प्रभाग क्रमांक 5 मधून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तेसुध्दा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत, तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते इरफानूर रहेमान खान यांचे सुपूत्र अहजम अफनान इरफान रहेमान खान हे निवडणूकीच्या रिंगणात भवितव्य आजमावित आहेत. ज्येष्ठ माजी नगरसेवक प्रभाकर लंगोटे यांचे सुपुत्र विकास लंगोटे हे प्रभाग क्रमांक 13 ड मधून रिंगणात आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते डॉ. अनिल कांबळे यांनी या निवडणूकीच्या तोंडावर शिवसेना उबाठा गटात प्रवेश करीत त्यांच्या कन्या अबोली कांबळे यांना प्रभाग क्रमांक 15 मधून निवडणूक रिंगणात उतरविले. त्यामुळे डॉ. कांबळे यांच्यासह आपल्या पुत्राच्या राजकीय पदार्पणाकरीता ज्येष्ठ नेते पडद्याआड किंवा पडद्यावर प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार अ‍ॅड. तुकाराम रेंगे पाटील यांचे सुपुत्र दत्तराव रेंगे पाटील यांनी या निवडणूकीच्या ऐन तोंडावर भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला व प्रभाग क्रमांक 1 मधील ‘ड’ गटातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुरेशदादा देशमुख यांचे सुपुत्र गणेश देशमुख यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उडी मारली. अ‍ॅड. रेंगे यांच्या सुपुत्राच्या या कृतीने राजकीय वर्तूळात मोठी अस्वस्थता पसरली. परंतु, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रेंगे यांनी निवडणूकीच्या या रिंगणात सक्रिय होऊन त्याबद्दल स्वतःची भूमिका जाहीर केली. पक्ष महत्वाचा आहे, आपण मुलाऐवजी पक्षासोबत आहोत, असे नमूद केले.

बहिणीसाठी भावाची लढाई...

वसमत रस्त्यावरील प्रभाग क्रमांक 15 मधून शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री ज्ञानोबा जावळे यांनी निवडणूक रिंगणात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांच्या नात्याने भगिणी आहेत. त्यामुळे त्यांच्याकरीता भरोसे हे प्रयत्नशील आहेत.

दीर आणि भावजयीची राजकीय प्रतिष्ठा...

महानगरपालिकेच्या या निवडणूकीत प्रभाग क्रमांक 16 मधून माजी नगराध्यक्षा श्रीमती जयश्री खोबे या निवडणूक रिंगणात आहेत. त्या पूर्वी काँग्रेसच्या नगरसेविक होत्या. तत्कालीन काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या त्या कट्टर समर्थक होत्या. परंतु, श्रीमती खोबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. निवडणूकीच्या तोंडावर श्रीमती खोबे यांनी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या यशवंत सेनेच्या माध्यमातून रिंगणात उडी मारली. याच प्रभागात त्यांचे दीर तथा माजी नगरसेवक शाम खोबे हे ही राजकीय भवितव्य आजमाविण्याकरीता रिंगणात आहेत. तेसुध्दा काँग्रेसचे नगरसेवक होते. परंतु, या निवडणूकीत ते शिवसेना उबाठा गटाकडून रिंगणात उतरले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande