
परभणी, 12 जानेवारी (हिं.स.)।परभणी शहर महानगरपालिका निवडणूक शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी परभणी पोलिस दल झाले असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरात रूटमार्च आयोजित करण्यात आला. या रूटमार्चचे नेतृत्व पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी आणि अपर पोलिस अधिक्षक तसेच गुंजाळ यांनी केले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था आबाधित राहावी तसेच महापालिका निवडणूक शांततेत, भयमुक्त वातावरणात आणि निष्पक्षपणे पार पडावी यासाठी परभणी पोलिस दलाने उपाययोजना केल्या आहेत. त्यामध्ये विशेष रात्रगस्त बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या संकल्पनेतून निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नियमित रात्रगस्त मोहीम राबविण्यात येत आहेत. सहायक पोलिस अधिक्षक जीवन बेनिवाल यांच्यासह नवा मोंढा, नानलपेठ आणि कोतवाली पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि अंमलदार या मोहिमेत पायाी पेट्रोलिंग, रूटमार्च आणि रात्रगस्त करीत आहेत. तसेच यासाठी अधिकचा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
रात्रगस्त बंदोबस्तासाठी परभणी शहराबाहेर दररोज एक उपविभागीय पोलिस अधिकारी, तीन पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, सहा पोलिस उपनिरीक्षक तसेच प्रत्येकी पाच पोलिस अंमलदार असे एकूण ५० पोलिस अंमलदार आणि पोलिस मुख्यालयाचे ६० अंमलदार असे एकूण ११० पोलिस अंमलदार तैनात करण्यात आले आहे.
रूटमार्चचे नेतृत्व पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी आणि अपर पोलिस अधिक्षक सुरज गुंजाळ यांनी केले. या रूटमार्चमध्ये सहायक पोलिस अधिक्षक जीवन बेनिवाल यांच्यासह दोन उपविभागीय पोलिस अधिकारी, पाच पोलिस निरीक्षक तसेच परभणी शहरातील सर्व पोलिस अधिकारी, पोलिस अंमलदार, आरसीपी पथक, ट्रायकिंग पथके आणि गृह रक्षक दलाचे जवान रूट मार्चमध्ये सामील होते.
परभणी शहरातील सर्व हालचालींवर आणि निवडणूक अनुषंगाने समाजमाध्यमांवर देखील पोलिस प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून कुठलाही अनुचित प्रकार अथवा संशयास्पद बाब आढळल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis