
जळगाव, 12 जानेवारी (हिं.स.)जळगाव शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका सराईत आंतरराज्यीय गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. चंदन राजू जुनी (वय ४५, रा. उल्हासनगर, जि. ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून दोन मोठ्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी दोन पथक तयार केले होते. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित आरोपी निष्पन्न झाला. तो पुण्यातील हडपसर येथील रामटेकडी परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. आरोपीला पुढील तपासासाठी शनिपेठ पोलिसांच्या हवाली करण्यात आले असून, त्याचे इतर साथीदार आणि चोरीच्या मालाचा तपास पोलिस घेत आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, उपनिरीक्षक शरद बागल, अतुल वंजारी, विजय पाटील, अक्रम शेख आणि नितीन बाविस्कर यांच्यासह तांत्रिक पथकातील कर्मचाऱ्यांनी केली आहे. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने जळगावातील शनिपेठ पोलिस स्टेशन अंतर्गत दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर