
-बच्चू कडू २० जानेवारीला करणार खुलासा
रायगड, 12 जानेवारी (हिं.स.) । रायगड जिल्हा परिषदेत शिक्षण व बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला भ्रष्टाचार दडपला जात असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. माजी मंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू भाऊ कडू येत्या २० जानेवारी २०२६ रोजी या कथित घोटाळ्याचा जाहीर भांडाफोड करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सत्ताधारी व प्रशासनिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षण विभागातील काही अधिकारी आणि संस्थाचालक संगनमताने विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार करत आहेत. या प्रकारांमुळे शिक्षणाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, बांधकाम विभागातही कार्यकारी अभियंते, उपअभियंते तसेच बेरोजगार अभियंत्यांना फसवून घोटाळे सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. संबंधित प्रकरणांमध्ये राजीपकडे तक्रारी व नोंदी असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.या पार्श्वभूमीवर बच्चू भाऊ कडू मुख्यमंत्री तसेच शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले जात आहे.
मुख्य मुद्दे :-
मागील ५ ते ६ वर्षांपासून शिक्षण व बांधकाम विभागात अनागोंदी व गैरप्रकार सुरू
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये ५० टक्के आरक्षण कायम
भांडाफोडाचा उद्देश विद्यार्थ्यांचे हित जपणे व प्रशासनात जबाबदारी निश्चित करणे
प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष सचिन साळुंखे यांनी सांगितले,
“हा खुलासा स्थानिक प्रशासनात सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि नागरिकांचा विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी निर्णायक ठरेल.”
या भांडाफोडीनंतर रायगड जिल्ह्यातील शिक्षण व बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराचे वास्तव स्पष्ट होऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, तसेच प्रशासनिक पारदर्शकता सुनिश्चित होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके