
रायगड, 12 जानेवारी (हिं.स.)। जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्यावतीने राष्ट्रीय अविष्कार अभियान सन २०२५–२०२६ अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता सहावी ते आठवीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना थेट इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो), बंगळुरू येथे अभ्यास भेट देण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये मंगळवारी (ता. १३ जानेवारी) विज्ञान विषयाची लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेत प्राविण्य मिळविणाऱ्या एकूण ४५ विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना राज्यांतर्गत तसेच राज्याबाहेरील नामांकित वैज्ञानिक संस्थांना भेट देण्याची संधी दिली जाणार आहे.
राष्ट्रीय अविष्कार अभियानांतर्गत निवडक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व वैज्ञानिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण अशा अभ्यास भेटीचे आयोजन करण्यात येत आहे. राज्यांतर्गत अभ्यास भेटीत पुणे येथील आयआयएसईआर, आयुका, एनआयव्ही, एनसीएल आणि आयआयटिएम या संस्थांचा समावेश आहे. तर राज्याबाहेरील अभ्यास भेटीसाठी विद्यार्थ्यांना बंगळुरू येथील इस्रोला नेण्यात येणार आहे.
जिल्हास्तरावर निवड प्रक्रियेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेतील प्रथम तीन शाळांमधून प्रत्येकी सहा अशा एकूण १८ विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. तसेच उर्वरित शाळांमधून २७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून अशा प्रकारे एकूण ४५ विद्यार्थ्यांना अभ्यास भेटीचा लाभ मिळणार आहे.
या संधीचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी विज्ञान परीक्षेत उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास चालना मिळणार असल्याचे मत शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके