
छत्रपती संभाजीनगर, 12 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीला दोन दिवस शिल्लक असताना उमेदवारांना प्रेमाचे भरते आले आहे. मतदारांना मोफत देवदर्शन सेवा घडविण्यात येत आहे. तर काही उमेदवारांनी वसाहतीनिहाय भोजनावळी आयोजित केल्या आहेत. काही उमेदवारांनी चक्क हुरडा पार्टी देऊन मतदारांना मोहीत केले आहे. उमेदवारांची संख्या आणि चुरशीची स्पर्धा पाहता दोन दिवस मतदार खऱ्या अर्थाने 'मतदार राजा' झाला आहे.
महानगरपालिका निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी बिनसल्यानंतर स्वतंत्र उमेदवार उभे आहेत. भाजप, शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, एमआयएम, बसप, आप या पक्षांनी एकमेकांना आव्हान दिले आहे. शिवाय, अपक्ष उमेदवारांची भर पडली आहे. त्यामुळे एका प्रभागात १६ ते २० उमेदवार उभे असल्याने मतदार बुचकळ्यात पडले आहेत. मतदान खेचण्यासाठी दोन दिवसांपासून मतदार 'मतदारराजा' झाले आहेत.
उमेदवाराने पुंडलिकनगर, हनुमाननगर, गारखेडा भागातील मतदारांना भद्रा मारुती दर्शन सेवा घडविली. त्यासाठी खास वाहनांचा बंदोबस्त करण्यात आला होता. मोफत देवदर्शनासाठी मतदारांनीही गर्दी केली होती. सातारा भागात उमेदवारांच्या घराच्या परिसरात भोजनावळी उठत आहेत. सुग्रास जेवणाचा बेत असल्याचे सांगण्यात आले सोसायटीनिहाय मतदारांची वर्दळ वाढली आहे. काही उमेदवारांनी मोफत हुरडा पार्टीचा बेत आयोजित केला होता. वाहनांनी मतदाराराजाला शहराबाहेर निसर्गरम्य परिसरात नेऊन हुरड्याचा आनंद दिला.
पुढील दोन दिवस आणखी कोणता फंडा उमेदवार वापरणार याची चर्चा रंगली आहे. वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रचारासाठी कार्यकर्ते मिळत नसल्यामुळे रोजंदारीने कार्यकर्ते आणले आहेत. शेवटच्या चार दिवसात कार्यकर्त्यांची मागणी आणि मानधन वाढल्यामुळे घरगुती काम करणाऱ्या महिलांनी सुटी जाहीर केली आहे. या महिला पक्षाच्या प्रचारफेरीत दिसत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis